नोटाबंदीनंतरच्या महिन्यात.. काळा पैसा खणून काढण्याचा दावा फोल, व्याजदर कपात नाही, एटीएमपुढील रांगा कायम, अर्थव्यवस्थेस फटका बसण्याची रिझव्‍‌र्ह बँकेला भीती.., ९ नोव्हेंबर २०१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नोटाबंदीची घोषणा..

‘आज रात्री बारा वाजल्यानंतर पाचशे व हजारच्या नोटा म्हणजे कागदाचा निव्वळ एक कपटा असतील’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेस आज, गुरुवारी एक महिना होत असून, या काळात सरकारला काळ्या पैशास चाप लावण्यात आलेले मर्यादित यश, विकासदर घटण्याचे व महागाई वाढण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे संकेत, बँका-एटीएमपुढील कायम असलेल्या रांगा, व्याजदरकपातीची फोल ठरलेली आशा, थंडावलेली घरखरेदी अशा बाबींमुळे हा महिना ‘भाकडमास’च ठरल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी निश्चलनीकरणाची घोषणा केली. त्यानंतर झालेला अभूतपूर्व चलनकल्लोळ पाहून, आणखी फक्त ५० दिवस सबुरी राखा, असे आवाहन त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी केले होते. इतकेच नव्हे, तर रागांमध्ये उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांना, ही रांग शेवटचीच, असा दिलासा देण्याचाही त्यांनी प्रयत्न नंतर केला. मात्र, गेल्या महिनाभरातील एकंदर अनुभव पाहता, असा दिलासा ५० दिवसांनी तरी मिळेल का, असा प्रश्न देशवासीयांच्या मनात उभा राहिला आहे.

 ११.५५ लाख कोटी जमा

रद्द करण्यात आलेल्या चलनातील पाचशे व हजारच्या नोटांचे एकूण मूल्य १५.४ लाख कोटी इतके होते. त्यातील ११.५५ लाख कोटी मूल्याच्या नोटा बँकामंध्ये जमाही झाल्या आहेत, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी दिली. रद्द केलेल्या नोटा बँकांत भरण्याची मुदत ३० डिसेंबपर्यंत असल्याने या रकमेत वाढ होणार, हे निश्चित. ही रक्कम अर्थातच वैध असल्याने पाचशे व हजारच्या नोटांच्या माध्यमातून काळा पैसा मोठय़ा प्रमाणात साठवून ठेवण्यात आला असल्याचे सरकारचे गृहितक फोल ठरले आहे.

  विकासदर घटण्याची भीती

नोटाबंदीचा परिणाम अभ्यासून मगच व्याजदर कपातीबाबत निर्णय घेण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारच्या भूमिकेने तमाम कर्जदार नाराज झाले. चलनतुटवडय़ाच्या कालावधीत स्वस्त कर्जाच्या रूपात काहीसा दिलासा मिळण्याची सामान्यांची अपेक्षा होती. मात्र व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने ती फोल ठरली. उलट, निश्चलनीकरणामुळे महागाई अधिक वाढण्याची भीती व्यक्त करतानाच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी चालू आर्थिक वर्षांसाठीचा देशाचा अंदाजित विकासदरही ७.१ टक्क्यांपर्यंत खाली आणला. परिणामी कर्जदारांचा मासिक हप्ता कमी होण्याची शक्यता आता दुरावली असून रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारच्या निर्णयाबद्दल उद्योगांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

गर्दी सरेना

चार लाख कोटींच्या नव्या नोटा छापून जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या असल्याचे ऊर्जित पटेल यांनी सांगितले. मात्र, रद्द झालेल्या १५ लाख कोटींच्या नोटांच्या तुलनेत या नोटा खूपच कमी असल्याने, गेल्या महिन्याभरापासून बँकांबाहेर पैशांसाठी सुरू असलेल्या रांगा अद्याप सरलेल्या नाहीत. बँकांमध्ये तासन्तास रांगा लावून देखील पैसे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील बहुतांश एटीएम केंद्र पैशाविना बंद असल्याचे चित्र आहे. शहरांपेक्षा वाईट स्थिती उपनगरे आणि गावांमध्ये आहे. तेथील अर्थ आणि समाजजीवन कोलमडले आहे.  १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे काम जोमात सुरू असल्याचा दिलासा ऊर्जित पटेल यांनी दिला असला, तरीही एटीएम केंद्रांमध्ये पैसे भरणा झाल्यावर ते तातडीने संपत आहेत.

रांगबळींना विधान परिषदेत श्रद्धांजली

नागपूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सुमारे ७० जणांचा आजवर मृत्यू झाल्याचे बोलले जाते. या रांगबळींना बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. नोटाबंदीवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘देशात सध्या सुरू असलेल्या गोंधळाला केंद्र सरकारच कारणीभूत आहे’, असा आरोप त्यांनी केला. ‘सरकार याला आर्थिक स्वातंत्र्याचा लढा म्हणत असेल तर जे लोक दगावले त्यांना शहिदाचा दर्जा दिला जावा’, अशी मागणी त्यांनी केली.