मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन कारवांमध्ये सोन्यासह परदेशी चलन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपी प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेले सोने व परदेशी चलनाची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.

मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभाग ३ ने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी २० मे रोजी मध्यरात्री तीन कारवाया केल्या. त्यात २४७ ग्रॅम २४ कॅरेट सोने व परदेशी चलन जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर बुधवारी प्रवाशांची तपासणी सुरू असताना बहरीन व दमण येऊन आलेल्या दोन प्रवाशांवर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी तपासणीत त्यांच्या ताब्यातील सामानाच्या ट्रॉलीवर लावलेल्या जाहिरात स्टिकरखाली काही संशयीत वस्तू लपवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. त्यांनी स्टीकर हटवले असता त्याच्या खाली सोन्याची लगड सापडली. तपासणी केली असता ते २४ कॅरेट सोने असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून २४७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत २१ लाख ९६ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दुसऱ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापळा रचून संशयीत प्रवाशाला अडवले. आरोपी प्रवासी मुंबईहून बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात परदेशी चलन सापडले. आरोपी प्रवाशाकडे ९० हजर अमेरिकन डॉलर्स सापडले. त्याची किंमत ७६ लाख २३ हजार रुपये आहे. याप्रकरणी आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सीमा शुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सीमा शुल्क विभागाने प्रवाशांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन ही यशस्वी कारवाई केली असून, अशा तस्करीविरोधातील मोहिमा सतत राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकॉक परदेशी चलनाचे केंद्र का बनले ?

बँकॉक व दुबई परदेशी चलना तस्करीचे केंद्रस्थान बनले आहे. या तस्करीत अनेक परदेशी टोळ्या सक्रिय असून त्यामागे हवाला व्यवसायिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. बँकॉकमध्ये पर्यटन व्यवसाय तेजीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार होतात. जगभरातूनही मोठ्या प्रमाणात थायलंडमध्ये अमेरिकन डॉलरची तस्करी केली जाते. त्याचा फायदा हवाला व्यवसायायिकही घेत आहेत. परिणामी, बँकॉक आणि थायलंड परदेशी चलनाच्या तस्करीचे केंद्र बनले आहे.