मुंबई : अहमदाबाद आणि राजकोट शहरात जाहिरातीद्वारा तरुणांची भरती करुन त्यांना सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याची बाब गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाली आहे. बॅंकिंग प्रक्रियेसाठी तरुण हवेत, अशी जाहिरात करुन बेरोजगार तरुणांना आमीष दाखविले जात असून त्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर केला जात आहे.

देशभरातील ८३ प्रकरणांतील सुमारे ५०० कोटी रुपये दुबईतील हस्तकांना पाठविण्यात आले असावेत, अशा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे. या रकमेपैकी ५० ते ६० कोटींची रक्कम रोखण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने गोव्यातून २० ते २५ वर्षे वयोगटातील १२ तरुणांना अटक केली. या तरुणांनी गेल्या सहा ते आठ महिन्यांत गोव्यामधून सुमारे ५०० कोटी रुपये दुबईत हस्तांतरित केले असून ही रक्कम सायबर फसवणुकीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुबईतून चालविल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळीशी संबंध असल्याचा दावा गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त राजरोशन तिलक यांनी केला आहे.

गुन्ह्याची पद्धत

यासाठी मुंबईत आणखी एक टोळी कार्यरत असून ती विविध बँकाक खाती उघडण्याची प्रक्रिया पार पडते. वेगवेगळ्या गरजूंना काही रक्कम देऊन त्यांचा तपशील घेऊन ही खाती उघडली जातात. त्यानंतर बॅंकेशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच चेकबुक, एटीएम कार्ड, पासबुक आदी साहित्य बसद्वारे गोव्याला पाठविले जाते. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम जमा करणे, रक्कम काढणे आणि विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरण करण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॅंकांतील कर्मचाऱ्यांचा ही खाती उघडण्यासाठी नक्कीच मदत झाल्याचा संशयही तपास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

गोव्यातील कलंगुट बीचजवळील ‘कासा द निकोल विला’ या भाड्याच्या दुमजली बंगल्यातून या कथित कंपनीचे कामकाज होते. या तरुणांना गोव्यातील केंद्रावर पाठवण्यापूर्वी १० ते १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या तरुणांना ३० हजार रुपये मासिक वेतन आणि त्यांनी हाताळलेल्या व्यवहारांवर तीन टक्के कमिशन देऊ करण्यात आले होते. रक्कम हस्तांतरणाचे कामकाज सोपवण्यापूर्वी या भरती केलेल्या तरुणांना बँकिंग प्रक्रिया आणि डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण दिले गेले होते, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी ‘१०० पॅनेल’ आणि ‘रुद्र’ यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर केला गेला. ‘डिजिटल अरेस्ट’च्या फसवणुकीसह सायबर गुन्ह्यांतून मिळवलेली रक्कमही या नेटवर्कद्वारे वळवण्यात आली असावी, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. लॅपटॉप आणि मोबाईल फोनचा वापर करून अन्य बोगस व्यक्तींच्या नावे असलेली बँक खाती वापरण्यात येत होती. या कारवाईत गुन्हे शाखेने बंगलातीन १५ लॅपटॉप, १२८ एटीएम कार्ड, ८९ मोबाईल फोन, ७६ सिम कार्ड, २२ चेक बुक, ७७ पासबुक ताब्यात घेतले. या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी एक स्वतंत्र वही ठेवली होती. ही वही ताब्यात घेण्यात आली असून त्यामुळे सायबर फसवणुकीबाबत महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळू शकतील आणि या नेटवर्कशी संबंधित इतर बँक खाती व व्यक्तींची ओळख पटवण्यास मदत होईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्याने व्यक्त केला.