लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : समाज माध्यमावरील पोस्ट लाईक करण्याचे टास्क देऊन मराठी हास्य कलाकाराची ६१ लाख ८३ हजार रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणात उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीला अटक केली. अक्षयकुमार गोपाईनकुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हास्य कलाकाराची फसवणूक करण्यासाठी सायबर ठगांनी वापरलेली बँक खाती पुरविल्याचा अक्षयकुमारवर आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात कुटुंबासोबत राहात असलेल्या ४५ वर्षीय हास्य कलाकाराला सायबर ठगांनी व्हॉटस् ॲपवरून संदेश पाठवून इंस्टाग्रामवरील पोस्ट लाईक करण्यासाठी १५० रुपये देण्याचे आमिष दाखवले. पुढे, त्याला थोडे-थोडे करत २२ हजार रुपये देत पेड टास्क फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून ६१ लाख ८३ हजार रुपये उकळले.
हास्य कलाकाराने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर प्रादेशिक विभाग सायबर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अक्षयकुमारला अटक केली. अक्षयकुमारच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविली. कमिशन म्हणून त्याला काही रक्कम मिळाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.