मुंबई : नियमभंग केल्याप्रकरणी दंडाची रक्कम भरण्यासाठी लिंक पाठवून वाहन मालकांची फसवणूक करण्यास सायबर भामट्यांनी सुरुवात केली आहे. घाटकोपर परिसरात अशाच प्रकारे एका व्यवसायीकाला सायबर भामट्यांनी दीड लाख रुपयांचा गंडा घातला असून घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
घाटकोपर परिसरात वास्तव्यास असलेले राजेंद्र नार्वेकर यांच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी एक लिंक आली होती. ही लिंक आरटीओची असल्याचा त्यांचा समज झाला. यामध्ये त्यांच्या मोटारगाडीचा क्रमांक होता. तसेच दंडाची रक्कम एक हजार रुपये असल्याचेही त्यात नमूद होते. त्यांनी या लिंकबाबत माहिती न घेताच दंड भरण्याचा प्रयत्न केला. दंडाची रक्कम भरताना त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक नमूद करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार त्यांनी क्रेडिट कार्डचा क्रमांक नमूद करताच त्यांना एक ओटीपी आला. त्यावर ओटीपीची नोंद करताच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून काही वेळातच १ लाख ३४ हजारांची रक्कम गायब झाली.
ही बाब नार्वेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ संबंधित बँकेच्या ग्राहक प्रतिनिधीशी संपर्क क्रेडिट कार्ड बंद करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

