मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले होते. दरम्यान, हे ‘मुरासू’ चक्रीवादळ आज पहाटे ०३:३० ते ०५:३० च्या दरम्यान प्रतितास १२० किलोमीटर वादळी वाऱ्यांसह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले असून त्याने नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान ओंगोलजवळील किनारपट्टी ओलांडल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तेथील बहुतांश जिल्ह्यांत आज ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. हे वादळ वायव्य दिशेने पुढे सरकत असून आज दुपारपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी पावसाची, तर बहुतांश भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात सध्या वादळी पावसाच्या प्रभावामुळे कमाल तापमानात घट होऊन उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच कोकणपट्ट्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागातही वादळी पाऊस झाला. यात रत्नागिरी येथे १४.२ मिमी, रायगड ३.६ मिमी, तर सिंधुदुर्ग येथे २.७ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील उर्वरित भागात ढगाळ आणि कोरडे हवामान होते. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण प्रदेशातील काही जिल्ह्यांत मंगळवारी वादळी पावसाची शक्यता असून बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळाची तीव्रता आज दुपारपर्यंत कमी होणार असली तरीही काही भागात त्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाच्या प्रभावामुळे पुढील तीन दवसात राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होईल. त्यानंतर त्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यात किमान तापमानही सरासरीहून अधिक नोंदले जात असून पुढील काही दिवसात त्यात २ ते ३ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज वादळी पावसाची शक्यता कुठे ?

लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हवामान विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.