मुंबई : विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून मुंबईतील डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती. त्यामुळे मुंबईतील शेकडो नोकरदारांना घरचा जेवणाचा डबे पोहोचविणारे डबेवाले पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे ७ जुलै रोजी मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना वर्षभर घरच्या जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम डबेवाले करतात. मात्र, दरवर्षी गावच्या यात्रा तसेच, पंढरपूरच्या वारीसाठी आवर्जून कामातून वेळ काढून सुटी घेतात. यंदा आषाढी एकादशीला लाखो वारकरी असीम श्रद्धेने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्याचबरोबर विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांनीही पंढरपूर गाठले आहे. कामानिमित्त डबेवाले मुंबईत वास्तव्यास असले तरी त्यांची गावे देहू-आळंदी पंचक्रोशीत आहेत. त्यामुळे बहुतांश डबेवाल्यांच्या घरात वारीची पंरपरा आहे. शनिवारी संपूर्ण दिवस काम केल्यानंतर डबेवाले रात्री पंढरपूरला रवाना झाले. ६ जुलै रोजी एकादशीच्या शासकीय सुट्टीदिवशी डबेवाले पांडुरंगाचे दर्शन घेतील. त्यानंतर, ७ जुलै रोजी पंढरपुरात द्वादशीचा उपवास सोडल्यानंतर मुंबईकडे रवाना होतील आणि ८ जुलै, मंगळवारी डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डबेवाला कामगार कामात व्यस्त कितीही व्यस्त असले, तरीही पंढरीची वरी चुकवत नाहीत. त्यामुळे वारीसाठी डबेवाला कामगारांनी एक दिवसांची रजा जाहीर केली असून ७ जुलैला मुंबईत डबेसेवा बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. डबेवाल्यांची शेकडो वर्षांची वारीची परंपरा आहे. दरवर्षी तो सुट्टी घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. त्यामुळे काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे तळेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.