अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कष्टकरी-श्रमिकांचे नेते, ज्येष्ठ विचारवंत यांची हत्या म्हणजे महाराष्ट्रातून पुरोगामी विचार संपवण्याचा कट आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.
विधान परिषदेत शुक्रवारी विरोधी पक्षांच्या वतीने राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना मुंडे यांनी, कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, असा आरोप करीत गृहमंत्रीपद संभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले.
पुण्यात दाभोलकर यांच्यावर झालेला हल्ला आणि कोल्हापूरमध्ये पानसरे व त्यांच्या पत्नीवर झोलल्या हल्ल्यामध्ये साम्य आहे. विशिष्ट विचारसरणी त्या हल्ल्यामागे असावी असा संशय आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. पानसरे यांच्या हत्येला एक महिना होत आला तरी अजून मारेकरी पकडलेले नाहीत. दाभोलकर-पानसरे यांची हत्या म्हणजे राज्यातील पुरोगामी विचार संपविण्याच्या कटाचाच भाग आहे, असे मुंडे म्हणाले. लोणावळा शहरात कुमार रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमध्ये एका सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो, तिचा खून केला जातो, त्याबद्दल पोलिसांना व हॉटेलमालकाला जाब विचारायला गेलेल्या आंदोलकांवरच लुटमारीचे गुन्हे दाखल केले जातात, हीच का राज्यातील कायदा व सुव्यवस्था आहे, असा सवाल त्यांनी केला.