मुंबई : दादरच्या वीर कोतवाल उद्यानाजवळील अपघात आणि वाहनांना धडक, अंधेरीतील १४ वाहनांना धडक आणि मानखुर्द पुलाच्या कठड्याला बेस्टच्या कंत्राटी बसने दिलेली धडक या सर्व अपघातांना मानवी चुका कारणीभूत असल्याचे मंगळवारी बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले. या सर्व अपघातातील बस सुस्थितीत असून त्यात कोणताही तांत्रिक दोष नव्हता. चौकशीत चालकच दोषी असल्याचा दावा करत कंत्राटदाराला मात्र मोकळे सोडण्यात आले. मानखुर्द येथे झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत वाढत्या अपघातांबाबत समिती सदस्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर बेस्ट समितीने मानखुर्दसह दादर, अंधेरी बेस्ट बस अपघातामागील कारणही स्पष्ट केले.

मानखुर्द येथील पुलावरील दुभाजकाला सोमवारी बेस्ट बस धडकली. या घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. ही बस उतारावर असताना चालकाचे बेस्ट बसवरील नियंत्रण सुटले. ही बस अत्यंत वेगात होती. ही गा़डी अपघाताच्या दिवशी पहाटे ४.१८ वाजता आगारातून बाहेर पडली. अपघात होण्याच्या आधीही या बसच्या फेऱ्या व्यवस्थित झाल्या होत्या. तसेच १७ जुलैला बसची संपूर्ण तपासणी झाली होती. त्यात कोणताही बिघाड झाला नव्हता. बस अतिवेगातच होती, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. याशिवाय जून महिन्यात दादरमध्ये प्लाझा सिनेमागृहाजवळ विद्युत एसी बसचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की एकूण सात जण जखमी झाले होते. त्यापैकी नियाज अहमद (२८) याचा मृत्यू झाला होता. हँन्ड ब्रेक सोडताच त्वरित एक्सीलरेटरवर पाय दिल्याने हा अपघात झाला होता. या दोन्ही अपघातात मानवी चुकच आढळली.

अंधेरी पश्चिमेला आंबोली येथे १० जुलै रोजी सीएनजी बसने १४ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले होते. या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. चालकाने ब्रेक दाबला नसल्याने बस वेगाने पुढे जाऊन अन्य वाहनांना धडकली होती. या घटनांमधील तीनही बस या भाडेतत्त्वावर पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदारांच्या आहेत. या सर्व घटना मानवी चुकांमुळे घडल्याचे बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.

कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा

मानखुर्दमधील घटनेतील बस मातेश्वरी कंपनीची होती. बेस्टच्या अपघातांमध्ये मातेश्वरी कंपनीच्याच बस अधिक असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी केला. या बसवरील चालक रात्रभर सीएनजी बसची ड्युटी करून परत सकाळी बसवर चालक म्हणून काम करू लागला. अशा प्रकारे जीवघेणी अतिरिक्त कामाची जबाबदारी सोपविणे बंद करा आणि कंत्राटदारांवरही कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर बेस्ट उपक्रमाकडून यावर स्पष्टीकरण देताना मानखुर्दमधील घटना ही अतिवेगाने बस चालवल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बसवरील चालकाने अतिरिक्त काम (ओव्हरटाईम) केले नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मानखुर्दमधील घटना ही बेस्ट बस चालकाच्या बेदकारपणे गाडी चालविल्यामुळे घडली असून त्याने बसचा वेग कमी केला नसल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. चालकांचे वर्तन योग्य नाही. कंत्राटी बसचे वाढते अपघात पाहता भाडेतत्त्वाच्या बसवर आता विश्वास नाही. बेस्टने स्वमालकीच्या बसची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.