मुंबई : दादर प्लाझा येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी सकाळी झालेला अपघात हा बसचा ब्रेक निकामी झाल्याने घडल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र ताडदेव आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालात बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचे नमूद केले आहे. बसचा अपघात चालकाच्या निष्काळजीमुळेच झाला असला असून पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना (लायसन्स) रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या बसचा सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वीर कोतवाल उद्यानाजवळ अपघात झाला होता.

या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसचे ब्रेक निकामी झाल्याचा जबाब चालकाने दिला आहे. मात्र बसची तपासणी केली असता बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचे आरटीओने आपल्या अहवालात म्हटले आहे. आरटीओ ताडदेवच्या प्रथमदर्शनी अहवालानुसार जेव्हा आरटीओला अपघातग्रस्त बस मिळाली, तेव्हा बसच्या आतील वायरिंग अपघातामुळे तुटले होते. बसची तपासणी करण्यासाठी बस रस्त्यावर चालविणे आवश्यक आहे.

मात्र विद्युत बसचे वायरिंग तुटल्याने बस रस्त्यावर चालविणे शक्य नाही. परिणामी आरटीओ अधिकाऱ्यांनी उभ्या असलेल्या अपघातग्रस्त बसची तपासणी केली. तपासणी दरम्यान बसच्या गियर आणि हॅण्ड ब्रेकमध्ये कोणताही दोष निदर्शनास आला नाही.आरटीओ अधिकाऱ्यांच्या मतानुसार मानवी चुकीमुळे अपघात झाला आहे. चालकाने घाबरुन चुकुन एस्कलेटर दाबून गाडी फिरविली असावी, असे आरटीओ अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या अपघातग्रस्त बस बेस्ट प्रशासनाच्या ताब्यात असून उपक्रमाने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना (लायसन्स) रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.