मुंबई : मुंबई – भुसावळदरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा, पावसाळा आणि गणेशोत्सव काळात प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. सप्टेंबरपर्यंत दादर-भुसावळ विशेष रेल्वेगाडी धावणार असून पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून भुसावळ गाठणे सोपे झाले आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि अतिरिक्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दादर – भुसावळदरम्यान विशेष गाड्यांच्या सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०९०५१ दादर – भुसावळ त्रै-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ३० जूनपर्यंत चालवण्यात आली. आता ही रेल्वेगाडी २ जुलै ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर त्रै-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ३० जूनपर्यंत चालवण्यात आली. आता ही रेल्वेगाडी २ जुलै ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावेल. या दोन्ही रेल्वेगाडीच्या प्रत्येकी ३९ फेऱ्या अशा एकूण ७८ फेऱ्या धावतील.
गाडी क्रमांक ०९०४९ दादर – भुसावळ (साप्ताहिक) विशेष रेल्वेगाडी २७ जूनपर्यंत चालवण्यात आली. परंतु, प्रवाशांची मागणी आणि दादर-भुसावळ प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी ४ जुलै ते २६ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी ही रेल्वेगाडी धावणार आहे. या रेल्वेगाडीच्या १३ फेऱ्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ – दादर विशेष रेल्वेगाडी २७ जूनपर्यंत चालवण्यात आली असून आता ही रेल्वेगाडी ४ जुलै ते २६ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. या रेल्वेगाडीच्या १३ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होईल.
विशेष गाडी क्रमांक ०९०५० आणि ०९०५२ च्या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण विशेष तिकीट दराने संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या रेल्वेगाडीचे वेळापत्रक, डब्यांची रचना व थांबे यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एनटीइएस ॲपवर उपलब्ध आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेवरील गाडी क्रमांक ०९०५१ / ०९०५२ दादर – भुसावळ विशेष रेल्वेगाडीला मार्च २०२५ मध्ये पालघर येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला होता. हा थांबा कायम राहणार असून, पालघर येथील प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकावर रात्री १.२९ वाजता थांबेल आणि तिथून रात्री १.३१ वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर विशेष रेल्वेगाडी सायंकाळी ५.४० वाजता भुसावळवरून सुटेल. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात रात्री ३.१७ वाजता पोहोचेल आणि रात्री ३.१९ वाजता सुटेल.