मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मुंबई शहराची थेट सार्वजनिक वाहतूक जोडणी करण्याच्या दिशेने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने पाऊल टाकले आहे. दादर, बोरिवली आणि पुण्यातील स्वारगेटहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यातील दादर – नवी विमानतळ बस अटल सेतूमार्गे धावणार असून, मुंबई शहरातून विमानतळासाठी थेट एसटीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बुधवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
दादर आशियाड बसस्थानकातून सुटणारी बस हिंदमाता, भायखळा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कर्नाक बंदर आणि उलवेमार्गे नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. या मार्गासाठी प्रौढ प्रवाशांसाठी १७० रुपये, तर बालकांसाठी ८५ रुपये भाडे आहे. बोरिवलीहून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या बसला पश्चिम उपनगरातील अनेक प्रमुख ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, वाकोला, खार, वांद्रे, कलानगर, वाशी, नेरुळ, उरण फाटा आणि बेलापूर किल्ला या मार्गावरून ही बस धावेल. बोरिवली – नवी मुंबई विमानतळ प्रवासासाठी प्रौढांना २१० रुपये, तर बालकांना १०५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
पुण्यातील स्वारगेटहूनही विमानतळासाठी थेट ई-बस उपलब्ध करण्यात आली आहे. स्वारगेट, वनाज, चांदणी चौक, बालेवाडी, हिंजवडी फाटा आणि वाकड येथील इंदिरा कॉलेज या प्रमुख ठिकाणांवरून प्रवाशांना बस मिळणार आहे. यासाठी प्रौढना ४५५ रुपये आणि बालकांचे २३० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या सेवांसाठी १२ मीटर ई-शिवाई बस वापरण्यात येणार असून, पात्र सवलतधारकांना एनसीएमसी कार्डद्वारे नियमानुसार सवलत मिळणार आहे. विमानतळावर बससाठी स्वतंत्र वाहनतळ, क्यू रेलिंग आणि नियंत्रण कक्षाची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.
एनसीएमसी कार्ड सवलती
एसटी महामंडळाने सवलतधारी प्रवाशांना लागू केलेले एनसीएमसी कार्ड उपलब्ध असलेल्या प्रवाशांना १२ मीटर ई-शिवाई बससाठीच्या नियमानुसार प्रवासभाड्यातील सवलती लागू राहतील. या थेट बससेवेमुळे मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याहून विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अत्यंत वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
