मुंबई : मुंबईतील दादर परिसरात वायू गळती झाली असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दादरच्या प्रबोधनकार ठाकरे चौकाजवळील गोखले रोड परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या कामादरम्यान एका जेसीबी मशीनने चुकून महानगर गॅस वाहिनीला धडक दिल्याने ती फुटली आणि मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरु झाली. त्यामुळे परिसरातील वाहतूक खोळंबली आहे.
दादर पश्चिमेच्या प्रबोधनकार ठाकरे चौकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गोखले रोड परिसरात वायू गळतीची घटना घडली. या परिसरातील दुकानदार, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने तातडीने गोखले रस्ता व आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या चार गाड्या, महानगर गॅसचे तांत्रिक कर्मचारी आणि पोलीस पथके घटनास्थळी आहेत. अमर हिंद मंडळाजवळील परिसरात पूर्णपणे बंदोबस्त ठेवण्यात आला सन नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन संबंधित यंत्रणाकडून करण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला आहे. हा संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला असून इथून हजारो नागरिक प्रवास करत असतात तसेच वाहनांची या भागात वर्दळ असते.
सद्यस्थिती काय ?
सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच आगीची घटना नोंदली गेली नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून वायू गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गळतीची तीव्रताही अधिक असल्याने काही वेळात परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली आहेत.
