मुंबई : मध्य रेल्वेवरून दादर ते गोरखपूर रेल्वेगाडी नुकताच कायमस्वरूपी केली. तसेच आता उत्तरप्रदेशकडे जाणारी दादर – बलिया आणि बिहारकडे जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा अशा दोन नवीन रेल्वेगाड्या कायमस्वरूपी केल्या आहेत. यावर आक्षेप घेत रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे.
मध्य रेल्वे प्रशासन राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद करून, इतर राज्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. तसेच या विशेष रेल्वेगाड्यांना कायमस्वरूपी करून, उपनगरीय रेल्वे मार्ग अधिक विस्कळीत करत आहेत. आतापर्यंत विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली सुमारे ५० ते ६० रेल्वेगाड्या इतर राज्यात मुंबईतून धावत आहेत. नुकताच बिहार आणि उत्तर प्रदेशासाठी आणखी दोन रेल्वेगाड्या सोडल्याने रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.
मध्य रेल्वे प्रशासन लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करत नाही. तसेच ज्या लोकल धावत आहेत, त्या अवेळी धावतात. यात सीएसएमटी ते कसारा आणि कल्याण ते खोपोली या लोकल प्रचंड विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना विलंबयातना सहन करावा लागतात. तसेच नोकरदार वर्गाला लेटलतीफ कारभाराचा सामना करून, पगार कपातीला सामोरे जावे लागते.
प्रलंबित रेल्वे मार्गिकाचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा वाढवण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाद्वारे आश्वासन दिले जाते. परंतु, आता दोन रेल्वेगाड्या कायमस्वरुपी करून, त्यांच्यासाठी मार्ग कसा उपलब्ध होतो, असा प्रश्न कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे उपस्थित केला आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई रेल्वे विभागातून केंद्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र मुंबईच्या प्रवाशांकडे दुर्लक्ष होते. राज्यातील पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांना अधिक रेल्वेगाड्या सोडणे आवश्यक आहे. पंढरपूर, नागपूर, औरंगाबाद, शिर्डी, सोलापूर अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी अधिक मेल-एक्स्प्रेस चालविण्यात याव्यात.
या रेल्वेगाड्यांना कसारा आणि कर्जत या स्थानकात अधिकृत थांबे देण्यात यावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मराठी भाषिक अधिकारी नसल्याने, त्यांना राज्यातील धार्मिक स्थळांच्या बाबतीत अज्ञान असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ते याठिकाणांसाठी मेल-एक्स्प्रेसची वाढ करण्यात येत नाही.
पुढील एका महिन्यात बंद केलेल्या राज्यांतर्गत रेल्वेगाड्या सुरू कराव्यात. तसेच कसारा आणि कर्जत मार्गावर लोकल वाढविल्या पाहिजेत. अन्यथा संघटनेच्यावतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.
गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर-दादर विशेष ही गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल. तर, गाडी क्रमांक ०१०२५/०१०२६ दादर-बलिया-दादर विशेष गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४३/११०४४ दादर-बलिया-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल. तसेच, गाडी क्रमांक १३३७९/१३३८० दरभंगा ते लोकमान्य टिळक टर्मिनस कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी साप्ताहिक असेल आणि दर बुधवारी चालवण्यात येईल.
