मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधातील कारवाई कठोर केली असून अनेक रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याचे चित्र आहे. महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांची ओळख पटविण्यासाठी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार आता फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. मात्र, बांगलादेशी फेरीवाल्यांना लक्ष्य करताना मराठी व अधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने त्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न फेरीवाल्यांनी सतावत आहे. याबाबत दादरमधील फेरीवाल्यांनी लोकप्रतिनिधींची भेट घेतली असली तरीही अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही.
मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येताच महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा उचलला. बहुतांश बांगलादेशी नागरिक फेरीवाले बनून मुंबईत अनधिकृतरित्या राहत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आल्यानंतर बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांची समस्या नियंत्रणात आल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, बांगलादेशी फेरीवाल्यांना लक्ष्य करताना पात्र व मराठी फेरीवाल्यांवरही कारवाई केली जात असल्याचा आरोप दादरमधील फेरीवाल्यांकडून केला जात आहे.
पालिकेच्या कारवाईबाबत फेरीवाला संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी दादरमध्ये महानगरपालिकेने कठोर मोहीम राबविली होती. अनेक प्रयत्नांनंतर फेरीवाल्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केले. आता महापौर तावडे यांच्या भूमिकेमुळे पात्र फेरीवाल्यांचे उदरनिर्वाहाचे साधन पुन्हा बंद झाले आहे. महानगरपालिकेतर्फे २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या अनेक फेरीवाल्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कारवाईला न जुमानता व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, १० – १५ मिनिटांनी महापालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी येतात. महापालिकेने किमान पात्र नगरसेवकांना या कारवाईतून संरक्षण द्यावे, अशी मागणी फेरीवाले प्रतीक शिंदे यांनी केली. याबाबत फेरीवाले गुरुवारी पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहेत.
या समस्येबाबत फेरीवाल्यांनी मागील आठवड्यात आमदार महेश सावंत यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. सावंत यांनी फेरीवाल्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, अद्याप फेरीवाल्यांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत ठोस धोरण ठरविण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करत आहे. फेरीवाल्यांना हटविण्याचे काम महानगरपालिकेचे असले तरीही पोलीसच अधिक आक्रमकरित्या कारवाई करत आहेत. महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट नाही. राजकीय पक्ष स्वार्थासाठी फेरीवाल्यांचा बळी देत आहेत, असा आरोप महेश सावंत यांनी केला.
