मुंबई : सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा आणि वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी महानगरपालिकेने दादर येथील जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळाचा ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकास करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या वाहनतळावर अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला वाहनचालकांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिकांसाठी मासिक पास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ४०० सवलतीचे पास दिले जाणार आहेत. दरम्यान, येत्या १ जुलैपासून जगन्नाथ सावंत मार्ग व परिसरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात किंवा अन्य ठिकाणी वाहने उभी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी वाहनतळांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालिकेकडे विविध ठिकाणी हस्तांतरित झालेल्या एकूण ३७ वाहनतळांमध्ये एकूण ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. अशातच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.

जगन्नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाल गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सध्या २०० हून अधिक ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आले असून त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. ‘मॉडेल वाहनतळ’ उपक्रमांतर्गत ‘नो पार्किंग’ क्षेत्र अधिक स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवर गडद लाल व काळ्या रंगाचे पट्टे रंगविण्यात येत आहेत. सम-विषम दिनांकानुसार पार्किंग व्यवस्थेसाठी लाल व पांढरे पट्टे रेखाटले जात आहेत.

वाहनतळाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. वाहनतळ अधिक आकर्षक व सुरक्षित बनविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच ”व्हॅलेट पार्किंग” सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही महानगरपालिका विचार करत असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारच्या उपाययोजना मुंबईतील अन्य भागांमध्ये राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे, असेही त्यांनी नमूद केले.