मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांनी फेटाळलेला प्रस्ताव अखेर सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी विशेष महासभेत मंजूर केले. यावेळी प्रस्तावाच्या बाजूने सत्ताधाऱ्यांची ११२ मते, तर विरोधात ८९ मते पडली. अखेर सत्ताधाऱ्यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला दादर नायगाव भूखंड पुनर्विकास प्रस्ताव अखेर आज मंजूर झाला.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीचे बहुमत असले तरी गेल्या आठवडयाच्या कामकामात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाच चितपट केले होते. तातडीचे कामकाज म्हणून आणलेला प्रस्ताव विरोधकांनी बहुमताने फेटाळला. पक्षादेश काढलेला असतानाही नगरसेवक वेळेत न पोहोचल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली. विरोधकांनी एकजूट दाखवत तातडीच्या कामकाजाला संख्याबळाने विरोध केला.

वडाळ्यातील एक भूखंड विकासकाला देण्याबाबतच्या प्रस्तावासह तातडीचे कामकाज म्हणून आणलेले प्रस्ताव सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवावे लागले. यामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या नामुष्कीची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली व भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीसाही बजावण्यात आल्या.

हा पराभव झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सावधगिरीने पावले टाकत हाच प्रस्ताव शुक्रवारी विशेष सभा आयोजित करून पटलावर ठेवला. विशेष सभेत नियमित कामकाज म्हणून हा प्रस्ताव आणल्यामुळे विरोधकांना या प्रस्तावाला विरोध करता आला नाही. मात्र तरीही विरोधकांनी या प्रस्तावाच्या वेळी मतदान मागितले. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी मतदान घेण्याचे आदेश दिले.

सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेऊन मतदान घेण्यात आले. ही मतदानाची प्रक्रिया सुमारे एक तास चालली. त्यानंतर अखेर प्रस्तावाच्या बाजून ११२ मते पडली, तर विरोधात केवळ ८९ मते पडल्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्याचे महापौरांनी जाहीर केले. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता संबंधित पुनर्विकास प्रकल्पाला प्रशासकीय गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रस्ताव…

गेल्या आठवड्यात सुधार समितीच्या बैठकीत वडाळातील किडवाई मार्ग येथील दादर नायगाव विभागमधील आझाद नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या मालमत्तेचा विकास, तसेच लगतच्या कमलानगर म्हणून महापालिकेच्या मालकीच्या झोपडपट्टीव्याप्त भूखंडाच्या पुनर्विकासाला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. नंतर हाच प्रस्ताव तातडीचा विषय म्हणून मुंबई महापालिका सभागृहात पटलावर ठेवण्यात आला होता.

सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी प्रस्तावाला अग्रक्रम देण्याची मागणी करत प्रस्ताव सादर केला. यावेळी प्रस्तावाला शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला. हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून आणता येणार नाही असे सांगत मतदानाची मागणी केली होती. त्यावेळी सभागृहात घेण्यात आलेल्या मतदानाच्या वेळी सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळून ६१ मते पडली. तर विरोधी पक्षांकडून ५८ मते पडली. मतदानात नियमानुसार तीन चतुर्थांश मते न पडल्यामुळे हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून घेता आला नाही. त्यामुळे महापौरांना हा प्रस्ताव बाजूला ठेवावा लागला.

विकासकाचा प्रस्ताव तातडीचे कामकाज कसा काय असू शकतो

दरम्यान, विकासकाच्या फायद्याचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून कसा काय आणता येईल असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. नालेसफाई किंवा लोकांशी संबंंधित विषय असतील तर ते तातडाचे कामकाज म्हणून आणल्यास आम्ही विरोध केला नसता, अशी भूमिका पक्षाच्यावतीने त्यांनी व्यक्त केली.