मुंबई : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक व उघडया मॅनहोलचा निर्माण झालेला प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. वर्दळीचा भाग असणाऱ्या दादर टीटी मार्गावर रविवारी सकाळी उघडे मॅनहोल आढळून आले. काही चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री मॅनहोलचे झाकण चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाकणाचे वजन न पेलवल्याने चोरांनी तेथेच मॅनहोलचे झाकण टाकले आणि पळ काढला.
याप्रकरणी महापालिका प्रशासनाने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साकीनाका येथील खैरानी मार्गावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून २ जुलै रोजी असलम शेख (५५) या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर शहरातील उघड्या व धोकादायक मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरातील १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल्सपैकी ९६ हजार ३९३ मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, सुमारे आठ हजार मॅनहोल अद्यापही संरक्षक जाळ्यांविना आहेत.
शहरात मॅनहोलवरील झाकण चोरीचेही अनेक प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अद्यापही ते प्रकार थांबविण्यात पालिकेला यश आलेले नाही. दादर टीटी मार्गावर शनिवारी मध्यरात्री काही चोरट्यांनी मॅनहोलवरील झाकण चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र झाकणाचे प्रचंड वजन असल्याने त्यांना ते नेता आले नाही. त्यामुळे त्यांनी बाजूला काढलेले मॅनहोलवरील झाकण तेथेच टाकले आणि पळ काढला. रविवारी सकाळी उघडे मॅनहोल आढळल्याने नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर टीका करण्यास सुरुवात केली. संबंधित मॅनहोलच्या आसपास रस्तारोधक किंवा सूचनाफलक नसल्याने दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती.
तसेच, त्यावर संरक्षक जाळी लावण्यात आली नव्हती. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी मॅनहोलच्या आसपास दगड ठेवले. तसेच, नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी उघड्या मॅनहोलमध्ये झाडाची फांदी उभी करण्यात आली. नागरिकांनी याप्रकरणी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. याबाबतची माहिती मिळताच संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन उघडे मॅनहोल पुन्हा झाकले. तसेच, तेथे मॅनहोलवरील झाकण चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चोरीच्या प्रयत्नाप्रकरणी तक्रार दाखल केल्याचे एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर यांनी सांगितले.
उघड्या मॅनहोलचे बळी
यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये डॉ. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा वरळीतील उघड्या मनुष्य प्रवेशिकेमध्ये पडून मृत्यू झाला होता. मलनिःसारण वहिनीच्या स्वच्छता कामादरम्यान मार्च २०२४ मध्ये सुरज केवट, बिलास केवट, रामलगन केवट या तीन कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये स्वच्छता कामासाठीच आत गेलेल्या सुनील वाकोडे या कामगारालाही जीव गमवावा लागला. त्यापूर्वीही अशा पद्धतीच्या आणखी काही घटना घडल्या. त्यामुळे उघडे मॅनहोल झाकणे, त्याखाली संरक्षक जाळ्या बसविणे आणि मॅनहोल झाकणांचे चोरीचे प्रकार थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
