मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. या विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एका फेरीसह एकूण दोन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुंबई व उपनगरातील वारकऱ्यांना थेट पंढरपूर गाठण्याची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०४५ विशेष रेल्वेगाडी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता दादर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ९.१५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०१०४६ विशेष रेल्वे २६ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादरला पोहोचेल. या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीला दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा, दहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी; तसेच दोन द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण १८ डबे असतील. या विशेष रेल्वेचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी झाल्यास आवश्यकतेनुसार आणखी विशेष रेल्वे चालविण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.