मुंबई : मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकावर कुटुंबापासून ताटातूट झालेल्या आठ वर्षीय मुलीला दादर रेल्वे पोलीस आणि चाईल्ड हेल्प लाईन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांत सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

कुटुंबासोबत आठ वर्षीय मुलगी हाजीअली येथे फिरायला गेली होती. तेथून परतताना विक्रोळी येथील मामाच्या घरी जाण्यासाठी हे कुटुंब दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर आले होते. त्यावेळी फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गोंधळात मुलीची आई आणि इतर भावंडे लोकलमध्ये चढली. परंतु मुलगी फलाटावरच राहिली.

यामुळे मुलगी गोंधळली आणि रडू लागली. रडतरडत ती फलाट क्रमांक ८ वरून १२ वर आली. एका जागरूक प्रवाशाचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्यांनी तातडीने कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या मुलीला तत्काळ ताब्यात घेतले आणि रेल्वे पोलिस ठाण्यात आणले.

मुलगी खूप घाबरलेली होती आणि तिला घरचा पत्ता सांगता येत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तातडीने ‘चाईल्ड हेल्प लाईन’च्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. रेल्वे स्थानकात मुलीच्या पालकांच्या नावाची सातत्याने उद्घोषणा करण्यात येत होती. उद्घोषणा ऐकून तिचे पालक शीव स्थानकात उतरले आणि त्यांनी शीव रेल्वे पोलीसांशी संपर्क साधला. मुलगी दादर रेल्वे येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळताच पालकांनी दादर गाठले.

दादर रेल्वे पोलिस, चाईल्ड हेल्प लाइन आणि रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मुलगी आणि पालक यांची ओळख पटवली. पालकांचे ओळखपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला सुखरूप पाहून पालकांनी प्रशासनाचे आभार मानले. रेल्वे पोलीस ठाणे अंमलदार दत्ता भिसे, महिला पोलीस शिपाई प्रियांका कांबळे, चाईल्ड हेल्प लाइन वर्षा सुतार, रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया प्रियंका सकपाळ यांच्या अथक प्रयत्नाने आणि समन्वयामुळे मुलीची तिच्या कुटुंबाशी भेट झाली.