मुंबई : कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दादर-रत्नागिरी पॅसेंजर तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. त्यासाठी प्रवासी संघटनेने लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. नुकताच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्र देऊन, त्यांचे कोकणवासियांच्या मागण्या मांडल्या आहेत.

दादर रेल्वे स्थानक ते रत्नागिरी दरम्यान पूर्वी धावणारी पॅसेंजर बंद झाल्यापासून मुंबईतील कोकणी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण आणि छोट्या व्यवसायासाठी वारंवार प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या एक्स्प्रेसचे भाडे तुलनेने जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडत नाही. त्यामुळे कमी दरातील पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांनी पत्रामध्ये नमूद केले आहे की, कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असूनही स्थानिक स्तरावरील स्वस्त आणि सुलभ प्रवासाची सुविधा कमी आहे. त्यामुळे सध्या दिवा ते रत्नागिरी धावणारी रेल्वेगाडी सीएसएमटी येथून सुरू करावी. असे केल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल.

मुंबईतील प्रवाशांना कोकणातील प्रवास सोयीस्कर होण्यासाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा विस्तार सीएसएमटीपर्यंत करणे आवश्यक आहे. तसेच सध्या दिवा स्थानकात रेल्वेगाडीमध्ये पाणी भरण्याची सुविधा नसल्याने ही रेल्वेगाडी पनवेल येथे पाणी भरण्यासाठी नेली जाते. त्यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला ३० ते ४५ मिनिटे उभे राहावे लागते.

तसेच, मध्य रेल्वेवरील ९ थांबे रद्द करूनही मध्य रेल्वेवर या गाडीच्या प्रवास वेळेत विशेष घट झाली नाही. किमान एक तासाची घट अपेक्षित असता, फक्त १० ते २० मिनिटांची घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा विस्तार सीएसएमटीपर्यंत करणे अपेक्षित आहे.

तसेच दिवा आणि दादरचे फलाट कमी लांबीचे असल्यामुळे वर्षभर गर्दी असूनही रत्नागिरी-दिवा आणि सावंतवाडी – दिवा या रेल्वेगाड्यांचे डबे वाढवता येत नाही. ही रेल्वेगाडीचा विस्तार सीएसएमटीपर्यंत करून, ही रेल्वेगाडी २२ ते २४ डब्यांची करावी, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून करण्यात आली.

कोकणवासियांच्या मदतीला मनसे धावून येणार

कोकणवासियांच्या भावनांशी खेळणाऱ्या रेल्वे प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुढाकार घेतला आहे. मंगळवारी मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांना जाब विचारणार आहेत. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून, त्या वेळेच्या दरम्यान दादर – गोरखपूर एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्यात येत असल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात येणार आहे.