मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतींना उजाळा देण्याऱ्या दालनाची गेल्या काही वर्षात दूरवस्था झाली असून दालनात कबूतरांचा वावर वाढला असून दालनातील छायाचित्रांना बुरशी लागली आहे. या दूरवस्थेविरोधात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. दालनावर केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी यावेळी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केली.
दादर शिवाजी पार्क परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृती जतन करणारे एक दालन मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केले होते. या दालनाची गेल्या चार वर्षात दूरवस्था झाल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाने केला असून सत्ताधारी महायुतीवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दालनाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून मुंबई महापालिकेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, गेली चार वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासकांचे राज्य होते. गेल्या चार संयुक्त महाराष्ट्र दालनात पर्यटकांपेक्षा कबुतरांचीच संख्या वाढली आहे. दालनाची दूरवस्था झाली असून दालनावर केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. गेल्या चार वर्षात दालनाची पूर्णपणे उपेक्षा झाली आहे.
‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दांत पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. मुंबईकरांनी सत्ता कुणाच्या हातात दिली आहे, हे आता स्पष्ट दिसत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. हे दालन तुमच्या कक्षेत येत नाही का? एकही अधिकारी येथे उपस्थित नाही. अधिकारी आतमध्ये येतच नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
दालनासाठी मंजूर करण्यात आलेला निधी खर्च न झाल्याचा आरोप करून निधी कुठे खर्च झाला याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचे सांगून, दालनातील फोटोंना बुरशी लागल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार, खासदार ठाकरेंचे मग आताच का आठवण झाली …
किशोरी पेडणेकर यांच्या आंदोलनावर सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. या भागात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आणि खासदार होते तेव्हा या दालनाची आठवण झाली नाही का असा प्रश्न शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी उपस्थित केला आहे. या दालनासाठी आतापर्यंत कोणी निधी मागितला होता का, निधी दिला नाही का, निधी खर्च झाला नाही असे काहीच झालेले नसताना बिनबुडाचे आरोप करू नये अशी प्रतिक्रिया सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.
