मुंबई : दादर पश्चिम येथील ४६ वर्ष जुन्या स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका मंडईच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. या दुरूस्तीकामासाठी महापालिका तब्बल २.९४ कोटी रुपये खर्च करणार आहे. काँक्रिटची पायाभरणी, विद्युत कामे, लोखंडी गेट व जाळी बसविणे, लादीकरण करणे, रंगकाम, आवश्यकतेनुसार सिमेंट गिलावा, प्लंबींग व ड्रेनेजची कामे, वाळवी प्रतिबंधक उपाययोजना आदी विविध कामांचा त्यात समावेश आहे. दादरमधील सर्वांत मोठी घाऊक मंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती.

उंदीर, घुशींच्या वावरामुळे मंडईत अस्वच्छता व दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांची मोठी गैरसोय होत होती. तसेच, ग्राहकांनाही नाक मुठीत घेऊन वावरावे लागत होते. सहाय्यक आयुक्त ( बाजार) यांच्या मालकीच्या या मंडईची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती रखडली आहे. २०२२ मध्ये मेसर्स रेट्रो फिटर्स कन्सल्टींग इंजिनिअर्सकडून मंडईची संरचनात्मक तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंडईला धोकादायक (सी- २ प्रवर्ग) घोषित करण्यात आले. तसेच, मुख्य दुरुस्त्या करण्याची शिफारस करण्यात आली. या मंडईच्या दुरूस्तीसाठी पूर्वी खासगी विकासकाने पसंती दर्शविली होती. मात्र, विक्रेत्यांनी त्यास कडाडून विरोध केल्यानंतर महापालिकेने मंडईची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. या मंडईत सुमारे ३०० किरकोळ व घाऊक विक्रेते आहेत. या कामासाठी महापालिकेतर्फे एकूण २ कोटी ३६ लाख ९६ हजार ७६९ रुपये एवढा अंदाज वर्तविण्यात आला होता.

त्यासाठी तीन कंत्राटदारांकडून पालिकेला निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी मेसर्स विकाश एन्टरप्राईसेस या कंपनीने कार्यालयीन अंदाजाच्या उणे २९.९९ टक्क्यांनी काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार पालिकेने मंडईच्या संरचनात्मक दुरुस्ती कामासाठी मेसर्स विकास एन्टरप्राईसेस या कंपनीची निवड केली. या कामासाठी महापालिका प्रशासन सर्व करांसह तब्बल २ कोटी ९४ लाख २६ हजार ०८८ रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासहित १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

कोणती कामे केली जाणार छताकरिता गॅल्व्हॅल्युम पत्रे बसविणे व त्यासाठी आवश्यक लोखंडी व लाकडी ट्रसची उभारणी करणे, आवश्यकतेनुसार सिमेंट गिलाव्याची कामे, प्लास्टिक पाण्याची टाकी बसविणे, रंगकाम, वीट बांधकाम , प्लंबींगची व ड्रेनेजची कामे , छताकरिता लोखंडी कॉलम उभे करणे व त्याकरिता काँक्रिटची पायाभरणी , लोखंडी गेट व जाळी बसविणे, लाद्या, दरवाजे व खिडक्यांची कामे, स्टीलची कामे करणे, वाळवी प्रतिबंधक उपाययोजना, रेन वॉटर गटरची दुरूस्ती, विद्युत कामे अशी अनेक कामे केली जाणार आहेत.