दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये झालेल्या सुनील परब (५८) यांच्या मृत्यूची कसून चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी दिले.
महात्मा गांधी जलतरण तलावात पोहताना सुनील परब यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अलीकडेच निधन झाले होते. या प्रकरणाला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत वाचा
फोडली.
सुनील परब यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी न करताच त्यांना तरणतलावात पोहण्यास परवानगी कुणी दिली, असा सवाल करुन आंबेरकर म्हणाले की, महात्मा गांधी तरणतलावामध्ये सुधारणा करण्याचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले असून तेथे लागणारे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचाही त्यात समावेश होता. पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा. अंधेरी येथील तरणतलावात १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. परंतु त्यांची आजतागायत अंमलबजावणीच झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसेच पालिकेच्या तरणतलावस्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली.
सुनील परब यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र का घेण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित करून सभागृह नेते यशोधर फणसे म्हणाले की, जलतरण तलावांवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास सायन, नायर आणि केईएममधील डॉक्टरांची तेथे नियुक्ती करावी.
महापौर सुनील प्रभू यांनी या प्रकरणी बैठक घेऊन दर सहा महिन्यांनी तरणतलावांमध्ये वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करावे, तसेच पोहण्यास येणाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे असे आदेश दिल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.