मुंबई : घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पांढऱ्या पट्ट्या हटविण्यासाठी मनसेने शनिवार, दुपारी ३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार प्रशासनाने सकाळीच घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कार्यवाही सुरू केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचे दादरमधील गोखले मार्गावर जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालयापासून काहीच अंतरावर जैन धर्मियांचे देरासर असून त्या भागातील रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. ही बाब समजताच संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवार, दुपारी ३ पर्यंत संबंधित पट्ट्या पुसाव्यात, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देशपांडे यांनी प्रशासनाला दिला. त्यांनतर प्रशासनाने तातडीने पट्ट्या पुसण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.

सद्यस्थितीत महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या देखरेखीत पट्ट्या पुसण्यात येत आहेत. दरम्यान, जैन धर्मीयांची ही पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसेने दुपारी ३ पर्यंतची वेळ प्रशासनाला दिली होती. मात्र, त्यापूर्वीच प्रशासनाने आमच्या इशाऱ्याची दखल घेतली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी विद्याविहार येथील एका सोसायटीत जैन समाजासाठी पांढरी पट्टी आखण्यात आली होती. त्यावर एका रहिवाशाने आक्षेप घेत सार्वजनिक जागेचा गैरवापर असल्याचे म्हटले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थिने त्या पट्टीवर लाल व पिवळे पट्टे मारून मार्ग काढण्यात आला. त्यांनतर लगेचच शिवसेना (ठाकरे) – मनसेच्या बालेकिल्ल्यात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पांढऱ्या पट्टीवरून जैन – मराठी हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. सार्वजनिक रस्ते किंवा सोसायटीच्या आवारातील जागा सर्वधर्मीय रहिवाशांसाठी असते. अशा ठिकाणी केवळ एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी मनमानी कारभार करू नये, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे.