मुंबई : दादर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक उड्डाणपुलालगत केबल पुलाचे काम सुरू असून भविष्यात हा मुंबईतील पहिला जुळा (ट्विन) केबल पूल ठरणार आहे. दादरमधील टिळक पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या असून या पुलाचे अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करून विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात दादरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या मुंबईत अतिधोकादायक पुलांच्या दुरुस्तीची आणि पुर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाची कामे वेगाने सुरू आहेत. शीव, प्रभादेवीप्रमाणे अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक पर्यायी उड्डाणपुलावरून वळण्यात आली आहे. त्यामुळे इतर पुलावर वाहतूक कोंडी होत आहे.
यापैकीच एक टिळक पूल आहे. टिळक पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून आता प्रभादेवी उड्डाणपुलावरील वाहतूक या पुलावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्यान, टिळक पुलालगतच्या केबल पुलाचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षी हा नवा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने (महारेल-एआरआयडीसी) या पुलाचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या पुलालगत नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असून त्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात जुन्या पुलाचे पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येईल. परिणामी, दादर पूर्व-पश्चिमेची वाहतूक सेवा खंडीत होणार नाही.
सध्या शीव आणि प्रभादेवी उड्डाणपूल बंद केल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु, टिळक पुलाच्या कामामुळे प्रवाशांना द्रावीडी प्राणायाम करण्याची वेळ येणार नाही. दरम्यान, सध्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली असून तुळया, पुलाचे खांब उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती महारेलने दिली.
सध्या टिळक पुलालगत नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून, हा जुळा केबल पूल असेल. या पुलाच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत पुलाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल जून २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याचे लक्ष्य आहे, असे महारेलद्वारे सांगण्यात आले.
– जुळा केबल स्टेड पुलाची लांबी ६०० मीटर.
– पुलाची रुंदी १६.७ मीटर.
– वाहतुकीसाठी ये-जा करण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका.
– वाहतूक सुरळीत होईल आणि गर्दी कमी होईल.
– पुलासाठी ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित.
– पुलावर सेल्फी पॉइंटची व्यवस्था.
– संपूर्ण पुलावर अत्याधुनिक विद्युत रोषणाई.
