मुंबई : गोपाळकाल्यानिमित्त येत्या शनिवारी उंच थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई – ठाण्यासह आसपासच्या शहरांमधील तमाम गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मात्र यंदा मुंबई-ठाण्यातील नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या वाढल्याने पारितोषिकांची रक्कम गडगडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सहा, सात, आठ थर रचण्याची क्षमता असलेल्या गोविंदा पथकांच्या पदरात पारितोषिकापोटी नाममात्र रक्कम पडण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्सवाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न समस्त गोविंदा पथकांना पडला आहे.

दरवर्षी मुंबई – ठाण्यासह आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. उंच थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस सुरू असते. तर आयोजक आपल्या उत्सवात मोठ्या संख्येने आणि सर्वात उंच दहीहंडी फोडण्यासाठी बक्कळ रकमेचे पारितोषिक जाहीर करून गोविंदा पथकांना आकर्षित करीत असतात. त्यातूनच मुंबई – ठाण्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचे पारितोषक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात येतात. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई – ठाण्यातील बहुसंख्य गोविंदा पथके दोन महिने आधीपासूनच रात्रीचा जागर करीत थर रचण्याचा सराव करीत असतात.

यंदाही बहुसंख्य गोविंदा पथके सरावात व्यस्त होती. यापैकी किमान २० – २५ पथकांनी सरावाच्या वेळी नऊ थर रचले. गतवर्षी जय जवान आणि कोकण नगर गोविंदा पथकांनी १० थर लावत विश्वविक्रम केल्याने गोविंदा पथकांची अधिक थर लावण्याकडे कल वाढला आहे. तर काही गोविंदा पथकांनी १० थर रचून प्रत्यक्ष गोपाळकाल्याच्या दिवशी ११ थर रचण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचबरोबर पूर्वी पाच-सहा थरांवर समाधान मानणाऱ्या अनेक पथकांनी यंदा आठ थर रचण्यापर्यंत मजल मारली आहे. आठ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या मोठी असून या पथकांची संख्या १०० हून अधिक असल्याचे समजते.

ठाण्यातील प्रसिद्ध संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यंदाही ठाण्यातील वर्तकनगर येथील ठाणे मनपा शाळा क्रमांक ४४ च्या पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर १० थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामधील नऊ थर रचणाऱ्या पथकांना ५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

मात्र त्याच वेळी नऊ थर रचणाऱ्या ठाण्याबाहेरील गोविंदा पथकाला दोन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. आठ थर रचणाऱ्या पथकांना २५ हजार रुपये, ७ थरांसाठी १५ हजार रुपये, सहा थरांसाठी १० हजार रुपये, पाच थरांसाठी पाच हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. दरम्यान, संस्कृती प्रतिष्ठानने उत्सवाचे आयोजन करताना ठाणे आणि ठाण्याबाहेरील पथकांसाठी दुजाभाव केल्यामुळे मुंबईतील पथकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

घाटकोपरच्या अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित उत्सवात प्रथम नऊ, आठ आणि सात थर रचणाऱ्या पथकांना अनुक्रमे ५ लाख ५५ हजार ५५५, ३ लाख ३३ हजार ३३३, एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ, आठ आणि सात थर रचणाऱ्या पथकांना अनुक्रमे एक लाख रुपये, ४० हजार रुपये आणि ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर सहा थरांसाठी सात हजार रुपये, पाच थरांसाठी चार हजार रुपये, चार थरांसाठी दोन हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

भाजप ठाणे शहर (जिल्हा) आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील (प.) कॅसल मिल नाका येथील स्व. मीनाताई ठाकरे चौकात आयोजित उत्सवात प्रथम १० थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे, त्यानंतर १० थर रचणाऱ्या पथकाला दोन लाख २२ हजार २२२ रुपयाचे, तर प्रथम नऊ थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये, तर नंतर नऊ थर रचणाऱ्या पथकाला २ लाख २२ हजार २२२ रुपये पारिषिक देण्यात येणार आहे.

दरम्यान, अनेक आयोजकांनी पहिल्यांदा नऊ, आठ थर फोडणाऱ्या पथकाला मोठ्या रकमेचे आणि नंतर तितकेच थर रचणाऱ्यांना कमी रकमेचे पारितोषिक जाहीर केल्यामुळे गोविंदा पथांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. संबंधित आयोजकांच्या उत्सवात प्रथम पोहोचून थर रचण्यासाठी गोविंदा पथकांना धावपळ करावी लागणार आहे. तसेच चार, पाच, सहा, सात थरांच्या पारितोषिकाची रक्कम कमी झाल्याने उत्सवाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न लहान गोविंदा पथकांना पडला आहे. मात्र एकूणच यंदा थर रचण्याची चुरस जीवघेणी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.