दहीहंडी उत्सवातून सेना-मनसेची निवडणुकीसाठी बेगमी

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शक्तिप्रदर्शन करण्याची तसेच यानिमित्ताने मतांची बेगमी करण्याची संधी लाटण्यासाठी राजकीय पक्षांनी गुरुवारी जोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनसेने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून चारपेक्षा जास्त थरांच्या दहीहंडय़ा शहरभर लटकवल्या आहेत, तर शिवसेनेनेही उत्सवातून अस्मितेचे राजकारण साधण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दहीहंडी फोडताना होणारे अपघात टाळण्यासाठी दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे यंदा दहीहंडीचे थर कोसळणार अशी जोरदार चर्चा मुंबईत सुरू झाली होती. मात्र, न्यायालयाचे आदेश धुडकावून मनसेने ठिकठिकाणी चार थरांपेक्षा अधिक उंच दहीहंडय़ा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेची मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी चेंबूर नाक्यावर बांधण्यात येणार आहे. मनसेचे पदाधिकारी कर्णा बाळा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही चेंबूर नाक्यावर ११ लाख रुपयांची सामूहिक दहीहंडी बांधली आहे. पाच थरांसाठी ३ हजार, सहा थरांसाठी ५ हजार, तर आठ थरांसाठी ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुलाबा मार्केट आणि फोर्ट परिसरातील टपाल खात्याच्या मुख्यालयाजवळ उत्सवाचे आयोजन केले असून दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला पारितोषिक देण्यात येणार आहे. सहा थरांसाठी ३ हजार रुपये, सात थरांसाठी ५ हजार रुपये आणि चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून काबीज केलेल्या दादरच्या बालेकिल्ल्यातही मनसेने दोन ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी नक्षत्र मॉलजवळ पाच लाखांची, तर अभिषेक गुप्ता यांनी दादरच्या विजय नगरमध्ये ५ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी बांधली आहे. ठिकठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दहीहंडय़ा बांधल्या असून यंदा मनसेतर्फे सुमारे एक कोटी रुपयांच्या पारितोषिकांची खैरात करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही कुलाबा, गिरगाव, लालबाग, परळ, दादरसह उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले आहे. शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी गिरगावमधील क्रांतिनगरसमोरील शिवसेना शाखेजवळ ३,३३,३३३ रुपयांची सामूहिक दहीहंडी बांधली आहे. येथील पहिली दहीहंडी फोडण्याचा मान अंधांच्या गोविंदा पथकाला देण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी ताडदेवमधील एसी मार्केटजवळ नियमानुसार उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ चार थरांची दहीहंडी येथे बांधण्यात येणार आहे. पहिल्या थरात चार गोविंदा, दुसऱ्या थरात दोन आणि नंतर एकावर एक असे दोन थर अशा पद्धतीने येथे दहीहंडी फोडण्यात येणार आहे. किती सेकंदात दहीहंडी फेडली जाते त्यावर पारितोषिक निश्चित करण्यात येणार आहे, असे अरविंद दुधवडकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोरिवली (पूर्व) येथील देवीपाडा मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून या उत्सवाच्या निमित्ताने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तसेच उत्सवाच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आपापल्या विभागांमध्ये नियमानुसार दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. न्यायालयाने र्निबध घातल्यामुळे संकल्प प्रतिष्ठानतर्फे वरळीच्या जांबोरी मैदानात उत्सवाचे आयोजन न करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतला आहे. मात्र यंदा जांबोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘अखंड महाराष्ट्र, अभेद्य महाराष्ट्र’ या संकल्पनेवर यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. नियमानुसार थर रचावेत असे आवाहन पथकांना करण्यात येईल. तसेच उत्सवस्थळी दर्शनी भागात पथकांना दिसेल अशी न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रदर्शित करण्यात येईल. गोविंदांनी नियमांचे पालन करावे.

-पांडुरंग सकपाळ, शिवसेना दक्षिण विभागप्रमुख

फोर्ट आणि कुलाबा मार्केट येथील उत्सवांमध्ये दहीहंडीची स्पर्धा होणार नाही. पारंपरिक पद्धतीनेच हा सण साजरा केला जाईल. दहीहंडीचा सराव करणाऱ्या गोविंदा पथकालाच उंच थर रचण्याची परवानगी देण्यात येईल. उत्सवस्थळी डीजेचा वापर न करता हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

-अरविंद गावडे, मनसे