मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे : डीजे, ढोल-ताशे, बेंजो यांचा दणदणाट, रस्ते अडवून मंडपांची उभारणी, दहिहंडी फोडण्यासाठी १४ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग, गोविंदांच्या जथ्यामुळे वाहतुकीची अडवणूक… राज्यातील विविध शहरांमध्ये दहिहंडीच्या उत्सवांमध्ये सर्रास नियमांचे उल्लंघन झाले. नागपुरात डीजेबंदीचा नियम झुगारण्यात आला, तर मुंबई, ठाण्यात रस्ते अडवल्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. मुंबईत दहीहंडी बांधलेला वीटांचा खांब कोसळून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर पिंपरीत दहिहंडीची कमान कोसळल्याने महिला ठार झाली.

मुंबईमध्ये आठ-नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक लहान पथके उंच थर रचण्याचा अट्टाहास करीत होते. त्याचबरोबर बहुसंख्य पथकांनी बंदी असतानाही १४ वर्षांखालील मुलांचा थरामध्ये वापर करण्यात येत होता, मात्र पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून सायंकाळी ६.३० पर्यंत ११८ गोविंदा जखमी झाले. मुंबई शहरातील ८३, पूर्व उपनगरांतील २१, तर पश्चिम उपनगरांतील १४ गोविंदांचा त्यात समावेश आहे. जखमी गोविंदांना तातडीने केईएम, नायर, शीव, राजावाडी, हिंदुजा, पोदारसह अन्य रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. यापैकी पाच गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८० गोविंदांवर उपचार सुरू होते. तसेच उपचार केल्यानंतर ३३ गोविंदांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा तब्बल २५४ सार्वजनिक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर केल्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील गोविंदा पथके ठाणे जिल्ह्यात दाखल झाली होती. सकाळपासूनच प्रमुख चौक आणि रस्त्यांवर गोविंदां पथकांचे जथे दिसून येत होते. मानवी मनोरा रचताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसले. मुंबईप्रमाणे ठाण्यातही दहिहंडीच्या मानवी मनोरे रचताना १४ वर्षांखालील गोविंदांनीही सहभाग घेतला. अनेक आयोजकांनी यंदा आवाजाची पातळी मात्र कमी ठेवल्याचे चित्र दिसून आले.

ठाण्यात वाहतूक कोंडी

दहीहंडीच्या आयोजनासाठी काही रस्ते बंद करण्यात आले होते. टेंभीनाका, रहेजा, घोडबंदर, कासारवडवली, पोखरण, कॅसल मिल नाका भागात आयोजित दहीहंडीमुळे मार्ग बंद करण्यात आले. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आल्याने या मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती. गोविंदा पथकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आल्याने कोंडीत भर पडली.

उत्सवाला गालबोट

मालाडमधील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथील सात ते आठ फूट उंचीवर बांधलेली दहीहंडी फोडताना अचानक हंडीची दोरी बांधलेला विटांचा खांब कोसळला. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर चढलेल्या रुद्र कदम याच्या अंगावर खांब कोसळला. घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

पिंपरीत दहीहंडीची कमान उतरवताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळ येथे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. मृत महिलेचे नाव सलमा पठाण (वय ४५) असे असून तिचा मुलगा विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाचा कार्यकर्ता असल्याने कुटुंबीयांनाी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ हे नोंदणीकृत नसून त्यांनी पोलिसांच्या अनेक अटींचे उल्लंघन केले आहे.

नागपुरात डीजेबंदीचा फज्जा

नागपूर : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १ नोव्हेंबरपर्यंत लागू केलेली डीजेबंदी झुगारून दहीहंडीनिमित्त शुक्रवारी महाल येथील बडकस चौकात डीजेचा दणदणाट करण्यात आला. या ठिकाणी लेझर लाइट्सचाही वापर करण्यात आला. आवाजाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. सायंकाळी सातच्या सुमारास आवाजाची पातळी ८० ते ८२ डेसिबल नोंदविण्यात आली. इतवारी परिसरातही शनिवारी दहीहंडीत डीजेचा वापर करण्यात आला.