मुंबई : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी रविवारी मुंबईत दिली. महाराष्ट्रातील दहीहंडी पथक, गोविंदा आणि दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या सहभागातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने परळमध्ये ‘कृष्णानंद सोहळा’ आयोजिण्यात आला होता. परळच्या राष्ट्रीय मजदूर मिल संघात झालेल्या या सोहळ्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गोविंदांना स्पेनलाही पाठवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच उत्सव साजरे करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन त्यांनी मंडळांना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांसह महाराष्ट्रातील महिला व पुरुष दहीहंडी पथके, गोविंदा तसेच दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करणे, गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, आवश्यक खबरदारी घ्यावी, रहदारीचे, वाहतूकीचे नियम पाळावे, पादचारी, नागरिक यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे शेलार यांनी मंडळांना मार्गदर्शन करताना सांगितले.
शहरी नक्षलवादाशी जोडलेले आहेत का?
गणेशोत्सवात मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध आणण्याच्या, मूर्ती कशापासून बनवाव्या यापासून ते पारंपरिक मंडपांना परवानगी मिळू नये, ध्वनिक्षेपकांच्या वापरावर, अगदी आरतीपासूनच, निर्बंध असावेत, अशाही मागण्या केल्या जातात. नागपंचमीच्या पारंपरिक खेळांवर, गोविंदा-दहीहंडी उत्सवातील उंची, थर, वय आणि आयोजनावरही मर्यादा आणण्याची भूमिका घेतली जाते. अशा प्रकारच्या मर्यादांच्या मागण्या करणारी ही लोक कोण आहेत? मला कोणत्याही अन्य धर्माबद्दल किंवा पंथाबद्दल बोलायचे नाही. पर्यावरणाची चिंता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची समस्या यांचा विचार नक्कीच केला पाहिजे. मात्र, एकामागून एक मर्यादा आणत आमच्या उत्सवांना बंदीच्या दिशेने नेले जात आहे. मराठी मातीतल्या, मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या सणांवर सातत्याने निर्बंध आणण्याची भूमिका दिसते. मात्र बंदीचा निर्णय आम्हाला मान्य नाही. अशा प्रकारच्या मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंतची भूमिका मांडणारे लोक शहरी नक्षलवादाशी जोडलेले आहेत का, हाच माझा थेट आरोप आहे. – आशिष शेलार</p>
