मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येत असल्याबद्दल स्थायी समितीने वारंवार आक्षेप नोंदवला आहे. मात्र स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत सल्लागार नेमणुकीचे अनेक प्रस्ताव समाविष्ट करण्यात आले आहेत. सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे शेवटचे टोक असलेल्या दहिसर – भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून या कामासाठी ५२ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील अन्य महापालिकांच्या हद्दीतून रोज लाखो नागरिक मुंबईत रोजगारासाठी येत असतात. मुंबईतील पश्चिम उपनगराला लागूनच असलेली मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील क्षेत्राचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास होत आहे. या भागातून दररोज सुमारे दहा लाख नागरिक नोकरी व कामानिमित्त ये – जा करीत असतात. या लाखो नागरिकांना ये – जा करण्यासाठी सध्या पश्चिम रेल्वेमार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग हेच दोन पर्याय आहेत.
पश्चिम रेल्वेवरील गाड्यांची संख्या वाढवली तरीही येथील गर्दी कमी होत नाही. तर पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहनांची संख्या खूप असल्यामुळे दहिसर चेकनाका येथील वाहतूक कोंडीमुळे या प्रवासाला बराच वेळ लागतो. त्यामुळे भविष्यात मुंबई – मीरा भाईंदर प्रवासासाठी नवीन पर्याय पुढे येणे आवश्यक आहे. यादृष्टीने आतापर्यंत अनेकदा दोन्ही महापालिकांनी प्रयत्न केले होते. मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता या दोन्ही महानगरांच्या पश्चिम दिशेला हा जोडमार्ग तयार करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग दहिसर पूर्व आणि भाईंदर पूर्व यांना जोडतो. मात्र नव्याने होणारा उन्नत जोड रस्ता दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) यांना जोडणारा असेल. त्यामुळे रेल्वेच्या लोकलगाड्यांवरील व पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पांतर्गत दहिसर (पश्चिम) येथील लिंक रोडपासून मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदरपर्यंत (पश्चिम) ४५ मीटर रुंद उन्नत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उन्नत मार्गाची अर्थात पुलाची एकूण लांबी ४.५८ कि.मी (४ ४ मार्गिका) आहे. यापैकी १.४५ कि.मी लांबी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असून ३.१३ कि.मी लांबी ही मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून हे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी यापूर्वी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून याकरता आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
दहिसर – भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्प
दहिसर – भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) हा मुंबई महापालिकेचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबई महानगरपालिकेने दक्षिण मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंत सागरी किनारा मार्ग तयार केला आहे. त्याचा पुढील भाग उत्तर मुंबईत तयार केला जाणार आहे. वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पुढे दहिसर – भाईंदर उन्नत मार्गाला जोडणार असल्यामुळे हा उन्नत मार्ग म्हणजे सागरी किनारा रस्त्याचे अंतिम टोक असेल. या प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटी असून हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम दरम्यानचे अंतर दहा मिनिटांत विनासिग्नल पार करता येणार आहे.
