मुंबई : दहिसर – भाईंदर जोडमार्ग प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डमध्ये उभारलेला तात्पुरता फलाट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल व्हिजेटीआयने पालिका प्रशासनाला सादर केला असून यामध्ये कंत्राटदार संस्थेला तीन कोटी रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पाबाबत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, अशीही भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दहिसर भाईंदर जोड रस्त्यांचे काम सध्या मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत सुरू आहे. या कामादरम्यान २ मे रोजी बांधकामाचा फलाट कोसळून झालेल्या अपघातात दोन मजूरांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात येईल, अशी घोषणा पालिका प्रशासनाने केली होती. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी ‘व्हीजेआयटी’च्या प्राध्यापकांच्या तज्ज्ञ पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने आपला चौकशी अहवाल पालिका प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालात घटनास्थळावरील त्रुटीची माहिती देण्यात आली असून सुरक्षाविषयक उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालानंतर पालिका प्रशासनाने कंत्राटदारावर तीन कोटी रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.
वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेच्या (व्हिजेटीआय) चौकशी अहवालात या तात्पुरत्या फलाटावर वेगवेगळ्या मापांचे बोल्ट वापरल्यामुळे तो कोसळल्याचे म्हटले आहे. सुरक्षा उपाययोजनांमधील त्रुटींवर अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. फलाटावरील रेलिंगची उंचीही कमी असल्याचेही आढळून आले.
रेलिंगची उंची वाढवण्याबरोबरच भार गणना आणि भार वितरणाचे योग्य मूल्यमापन करण्याची शिफारस अहवालात केली असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. रचनेची अंमलबजावणी डिझाइननुसार होत आहे की नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही अहवालात देण्यात आले आहेत.
याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अहवालात सुचवल्यानुसार कंत्राटदाराला काही सावधगिरीच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. त्रयस्थ संस्थेकडून सुरक्षिततेचा आढावा घेण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. तसेच व्हीजेटीआयने केलेल्या शिफारशींची कंत्राटदाराला अंमलबजावणी करावी लागणार आहे. दंड आणि शिफारशींची माहिती कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. त्यांनी सुरक्षिततेच्या सगळ्या उपाययोजना करूनच कामाला सुरूवात करावी, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
