मुंबई : दहिसर, बोरिवली आणि कांदिवली पूर्वेकडील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील मूलभूत नागरी सुविधांसाठी राज्य सरकारने चार कोटी रुपयांच्या १४ विकासकामांना मंजुरी दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या कामांसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी २० लाख रुपये वितरित केले जाणार आहेत.

बोरिवली पूर्व आणि दहिसर पूर्व परिसरातील आठ कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मीराचाळ, माताजी चाळ, वर्दंबा निवास चाळ, सिद्ध संदेश को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, साईनाथ चाळ आदी ठिकाणी गटार बांधणे, लादीकरण आणि मलनिःस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे केली जाणार आहेत. दहिसर पूर्वेतील श्रीकृपा एसआरए सोसायटी आणि संत ज्ञानेश्वरनगर येथे मलनिःस्सारण वाहिन्या, लादीकरण व पायवाटा उभारण्याची कामे होणार आहेत.

बोरिवली पूर्वेतील या कामांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, प्रत्येक कामासाठी ७.५० लाख रुपये म्हणजेच ३० टक्के निधी वितरित होणार आहे. याशिवाय मागाठाणे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये बाके आणि कचराकुंड्या बसविण्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे.

कांदिवली पूर्वेतील सहा कामांसाठी स्वतंत्रपणे दोन कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. आंबेडकर चाळीसमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, वस्तीत शौचालयाचे नूतनीकरण, पंचशील चाळीत लादीकरण, गटार व सुशोभीकरणासह प्रकाशव्यवस्था, पंचशील येथील सभागृहाचे नूतनीकरण आणि आंबेडकर चाळीसमोरील चौकात रेलिंग बसविण्याची कामे केली जाणार आहेत.

या सर्व कामांना मंजूर निधीच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला वितरित केली जाणार आहे. कामे प्रत्यक्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्येच होत आहेत, याची खातरजमा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना करावी लागणार आहे. वस्त्यांबाहेरील कामांना निधी दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

तसेच मंजूर नवीन कामांसाठी पाच टक्के वस्तूंची खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची पूर्तता झाल्याचे प्रमाणित केल्यानंतरच पुढील निधी वितरित केला जाणार आहे.