मुंबईः पत्नीशी झालेल्या वादातून ३२ वर्षीय आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची घटना दहिसर पश्चिम येथे घडली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू मानू राठोड (३२) असे अटक आरोपीचे नाव असून तो दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर परिसरातील रहिवासी आहे.
तो बिगारी काम करून चरितार्थ चालवतो. आरोपीचा त्याच्या पत्नीशी तीन दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून आरोपीने शनिवारी २७ वर्षीय पत्नीच्या डोक्यात ग्राइंडिंग मशीन मारले. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पप्पू राठोड हा स्वतः पोलीस ठाण्यात आला व घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता आरोपीची पत्नी बेशुद्धावस्थेत पडली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी राठोडला अटक केली आहे.