मुंबई : दहिसर ते मिरा-भाईदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकेचे लोकार्पण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही लोकार्पण रखडल्याने दोन मार्गिकांच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत नव्हता. पण आता मात्र प्रवाशांची प्रतीक्षा संपली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो ३ एप्रिलपासून धावणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १चा तसेच मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १चे काम २०२५ अखेरीस पूर्ण झाले. दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही बरेच दिवस झाले. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याबरोबर या दोन्ही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आधी पालिका निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर इतर काही कारणांमुळे या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण रखडले होते. राज्य सरकारला लोकार्पणासाठी मुहूर्त मिळत नव्हता. मात्र आता लोकार्पणाची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी ३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली. या दोन्ही मार्गिकेतील हे टप्पे सेवेत दाखल झाल्यास मुंबईला दोन नवीन मेट्रो मार्गिका मिळणार आहेत. त्यामुळे मुंबईतील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या सहावर पोहोचणार आहे, तर मेट्रो ९ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या रूपाने ठाणे जिल्ह्यालाही पहिली मेट्रो मिळणार आहे.
‘पॉड टॅक्सी’चे भूमिपूजनही
बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक अशी ८.८ किमी लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या पॉड टॅक्सीचे भूमिपूजनही शुक्रवारी, ३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
