मुंबई : दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा १ वरून प्रवास करण्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
त्यानंतर शनिवार, ४ एप्रिलला प्रवाशांना दहिसर – काशीगाव आणि डायमंड गार्डन – मंडाले मार्गिकांवरून प्रवास करता येणार आहे. लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी या मार्गिका सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. दहिसर – काशीगाव टप्पा सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना काशीगाववरून थेट मेट्रोने अंधेरी पश्चिमेला आणि गुंदवलीला येता येणार आहे.
तर गुंदवली आणि अंधेरी पश्चिमेवरून मेट्रोने काशीगावपर्यंत जाता येणार आहे. मेट्रो ९ मार्गिकेला दहिसर मेट्रो स्थानक येथे मेट्रो २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेशी जोडणी देण्यात आली आहे. त्यानुसार काशीगाव – अंधेरी पश्चिम आणि काशीगाव – गुंदवली अशा मेट्रो गाड्या चालविल्या जाणार आहेत. यासंबंधीचा निर्णय लवकरच एमएमआरडीएकडून जाहीर केला जाणार आहे.
मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचे काम २०२५ मध्येच पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गिकांतील पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र राज्य सरकारला केवळ लोकार्पणासाठी वेळ मिळत नसल्याने या दोन्ही मार्गिका सेवेत दाखल करता येत नव्हत्या. या मार्गिकांचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी होत होती.
अखेर आता या मार्गिकांच्या लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ एप्रिलला या मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दहिसर – काशीगाव आणि डायमंड गार्डन – मंडाले प्रवास मेट्रोने करता येणार आहे. मात्र या प्रवासासाठी मुंबईकरांना शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी या दोन्ही मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. दहिसर – काशीगाव आणि डायमंड गार्डन – मंडालेदरम्यान शनिवारपासून मेट्रो धावणार आहे. मुंबईकरांना मेट्रोमुळे डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.
वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. तर दुसरीकडे मिरा रोडवासीयांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दहिसर – काशीगावपर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहेच, पण त्याचवेळी काशीगाववरून थेट गुंदवली आणि अंधेरी पश्चिमेला पोहोचता येणार आहे. मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर मेट्रो स्थानक आणि मेट्रो २ अ, मेट्रो ७ मार्गिकेतील दहिसर स्थानक एकमेकांशी जोडण्यात आले आहेत.
आता काशीगावरून येणाऱ्या मेट्रोचे संचालन पुढे गुंदवलीपर्यंत आणि अंधेरी पश्चिमपर्यंत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे काशीगाव – अंधेरी पश्चिम आणि काशीगाव – गुंदवली मेट्रो प्रवास मुंबईकरांना, मिरारोडवासीयांना करता येणार आहे.
तर दुसरीकडे मेट्रो २ मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक येत्या एक-दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानकाला चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेतील व्हीएनपी-आरसी मार्ग जंक्शन स्थानकाशी पादचारी पुलाने जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मोनोरेल सुरू होईल आणि प्रवाशांना मेट्रोतून मोनोरेल आणि मोनोरेलमधून मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
