मुंबई…दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ काही महिन्यांपूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्याने अंधेरी ते काशीगाव असा प्रवास मेट्रोने करता येऊ लागला आहे. पण आता लवकरच अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास मेट्रोने करता येणार आहे. कारण आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील काशीगाव ते मिरा-भाईंदर टप्पा २ सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली), मेट्रो २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ९ टप्पा १ चे एकात्मिकीकरण करण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी या मार्गिकांवर १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होईल.

एमएमआरडीएकडून मेट्रो ९ मार्गिकेचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार काशीगाव ते दहिसर टप्पा १ चे काम पूर्ण करून ४.७ किमीचा हा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता काशीगाव ते दहिसर प्रवास १० ते १५ मिनिटांत करणे शक्य झाले आहे. त्याचवेळी काशीगावरून अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असाही मेट्रो प्रवास शक्य झाला आहे. मेट्रो २अ आणि ७ मार्गिकेचे एकात्मिकीकरण करण्यात आल्याने आता काशीगाव ते अंधेरी अशी मेट्रो सेवा सुरू आहे. तर आता लवकरच अंधेरी ते मिरा-भाईंदर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे. कारण आता काशीगाव ते मिरा-भाईंदर अशा मेट्रो ९ मार्गिकेतील टप्पा २ च्या संचालनाच्यादृष्टीने एमएमआरडीएने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मेट्रो ७, २अ आणि मेट्रो ९ टप्पा १ च्या एकात्मिकीकरणाच्या कामास सोमवारपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो मार्गिकांच्या एकात्मिकीकरणासाठी या मार्गिकांवर १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे तांत्रिक पथकांना प्रवासी सेवा सुरू नसलेल्या कालावधीत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे मायग्रेशन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सलग वेळ उपलब्ध होईल. त्याचवेळी प्रवासी सेवांवरील परिणाम केवळ सकाळच्या मर्यादित कालावधीपुरता ठेवण्यात आला आहे.

मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ च्या वेग चाचण्यांसाठी आवश्यक सिग्नलिंग सॉफ्टवेअर आता उपलब्ध झाले असून, त्यामुळे चाचणी आणि संचालन प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रक्रियेत चारकोप डेपो येथील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरमार्फत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे नियंत्रित मायग्रेशन आणि चाचणी करण्यात येणार आहे. विद्यमान मार्गिकांवर नियमित वेळेत प्रवासी सेवा सुरू असल्याने, अशा महत्त्वपूर्ण तांत्रिक चाचण्या केवळ प्रवासी सेवा बंद असलेल्या नियंत्रित कालावधीतच करता येतात. त्यामुळे मेट्रो २अ, ७ आणि ९ टप्पा १ मार्गिकेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या तिन्ही मार्गिकांवरील सेवा सकाळी ५.५० ऐवजी ६.३० वाजता सुरू होणार आहे. एकात्मिकीकरण पूर्ण करून पुढे या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत हा टप्पाही वर्षाअखेरीस सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.