आई-वडिलांमध्ये घरात होणारे रोजचे वाद आणि त्यातच बेरोजगार असल्याने घरच्यांकडून मिळणारे टोमणे… या मानसिक त्रासाला कंटाळून एका १८ वर्षांच्या तरुणाने इमारतीवरून उडी मारून जीवनप्रवास संपवण्याचा थरारक प्रयत्न केला. मुंबईतील दहिसर भागात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. मात्र, शेजाऱ्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोदरार व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मुंबईतील मालाड भागातील रहिवासी आहे. आई-वडिलांमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. तसेच, कोणतीही नोकरी किंवा कामधंदा करत नसल्याने त्याला घरातून नेहमी बोलणी खावी लागत असत. याच नैराश्यातून तो बुधवारी दहिसर (पूर्व) येथील जनकल्याण नगर भागातील आपल्या मावशीच्या घरी आला होता. मावशीच्या घरी असताना अचानक त्याने थेट घराच्या गॅलरीत (बाल्कनी) जाऊन खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

तरुण गॅलरीच्या कठड्यावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, शेजारी राहणाऱ्या सतर्क नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेजाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तिकडे धाव घेतली. तरुणाने उडी मारण्यापूर्वीच त्याला अत्यंत शिताफीने मागे ओढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले. शेजाऱ्यांच्या या देवदूतासारख्या धावून येण्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, तरुणाचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.