मुंबई: ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना कंत्राटादाराने यंत्रसामुग्रीचा वापर करून दगडी पायऱ्यांचे नुकसान केले. मनुष्यबळाच्या सहाय्याने हे काम करणे अपेक्षित असताना यंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच ऐतिहासिक वारसा असलेल्या तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

बाणगंगा ही पुरातन वास्तू आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तरावर झालेल्या बैठकांनुसार तसेच राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून घोषित करुन महानगरपालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेअंती पुरातन वारसा कामे (हेरिटेज) कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली.

हेही वाचा >>>ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने उच्च शिक्षित महिलेला नऊ लाखांचा गंडा

या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी प्रारंभी कंत्राटातील अटीनुसार हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने २४ जून रोजी एक्सकॅव्हेटर संयंत्र बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. त्यामुळे पायऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच डी विभागाने सदर काम थांबविले. तसेच संयंत्र बाहेर काढले. या प्रकरणी कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावत तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पायऱ्या पूर्ववत करण्याची कार्यवाही काही तासातच पूर्ण

दरम्यान, स्थानिक आमदार, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बाणगंगा तलाव येथे स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे तात्काळ हाती घेण्यात आली. हानी पोहोचलेल्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून पूर्ववत स्वरूपात झाले आहे.

चौकशीसाठी समिती स्थापन करणार

या पुढे अशी कोणतीही घटना होऊ नये, यासाठी स्थानिकांची एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती यापुढे होणाऱ्या कामकाजावर देखरेख करेल. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही समिती स्थापित होणार असून, ही समिती पुढील १५ दिवसात अहवाल सादर करणार असल्याची माहिती पालकमंत्री लोढा यांनी दिली.