मुंबई – यंदा मोसमी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून हा पाणीसाठा गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त आहे. गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात कधीही पावसाला सुरूवात होत नाही. जुलै महिन्यातच चांगला पाऊस पडतो. त्यामुळे दहा वर्षात १ जुलै रोजी धरणात इतका पाणीसाठा कधीही नव्हता.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या भागात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सातही धरणात मिळून ४१.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दहा अकरा वर्षातील हा जून महिन्यातील सर्वाधिक साठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणात मिळून ५ लाख ९५ हजार ८७६ दशलक्षलीटर म्हणजेच ४१.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र दरवर्षी मे महिन्यात पाणीसाठा खालावत जातो. अशावेळी पाऊस कधी पडतो याकडे मुंबई महापालिका प्रशासनाचे लक्ष लागलेले असते. यंदाही पाणीसाठा साडेआठ टक्क्यांपर्यंत खालावला होता.

१६ जून रोजी साडेआठ टक्के पाणीसाठा होता. मात्र १७ जूनपासून चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. तसेच आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी मातीतून झिरपत येणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठा दरदिवशी वाढतोच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे चार महिने पावसाचे असे गृहित धरले जात असले तरी गेल्या काही वर्षांपासून जून महिना कोरडाच जातो. प्रत्यक्षात जुलै महिन्यापासूनच पावसाला सुरूवात होते. त्यामुळे बऱ्याचदा जून महिन्यात पाणीकपातीची वेळ येते. यंदा मात्र जून महिन्यात धरणातील पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १ जुलै रोजी पाणीसाठा ५ टक्के होता. त्यापूर्वी हाच पाणीसाठा १२ टक्के होता. त्या तुलनेत यंदा धरणात तिप्पट- चौपट पाणीसाठा जमा झाला आहे.

दहा वर्षातील १ जुलै रोजीचा पाणीसाठा

  • १ जुलै २०२५ …. ४१.१७ टक्के
  • १ जुलै २०२४ …. ५.९१ टक्के
  • १ जुलै २०२३ …. १२.८५ टक्के
  • १ जुलै २०२२ …. १०.९० टक्के
  • १ जुलै २०२१ …. १८.२८ टक्के
  • १ जुलै २०२० …. ८.१८ टक्के
  • १ जुलै २०१९ …. ७.२२ टक्के
  • १ जुलै २०१८ …. २०.९५ टक्के
  • १ जुलै २०१७ …. ३३.९९ टक्के
  • १ जुलै २०१६ …. ७.६४ टक्के

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

  • उर्ध्व वैतरणा …. ४९.७९ टक्के
  • मोडक सागर …. ५३.४८ टक्के
  • तानसा …. ४३.१६ टक्के
  • मध्य वैतरणा …. ४४.७२टक्के
  • भातसा …. ३४.८३ टक्के
  • विहार …. ४२.३१ टक्के
  • तुळशी …. ४०.०२ टक्के
  • एकूण …. ४१.१७ टक्के