नवी मुंबई व पनवेलमध्ये चालणारे १४८ लेडीज सव्‍‌र्हिस बार हे सुरूच राहणार आहेत, असा वटहुकूम खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने काढला आहे. पोलिसांनी २० फेब्रुवारीपासून संबंधित बारमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरना अश्लील चाळे करताना पकडण्याचा धडाका लावल्याने महिला वेटरनी बारमध्ये येणे बंद केले होते. पोलिसांच्या या सामाजिक साफसफाईचा फटका बारमालकांना बसल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या विरोधात नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोशिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सामाजिक हित लक्षात घेऊन कर्तव्य बजावणारे पोलीस आयुक्त व त्यांचे शिलेदार बारमालकांशी कायद्याच्या वादात हरले आहेत. मंगळवारी न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने महिला वेटरना बारमध्ये येण्यास बंदी करू नये, असे आदेश नवी मुंबई पोलिसांना दिले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात लेडीज सव्‍‌र्हिस बारचा परवाना असलेल्या बारमध्ये महिला वेटरना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत, तर ज्या बारला ऑर्केस्ट्रा परवाना दिलाय, अशा बारमध्ये महिला रात्री दीड वाजेपर्यंत काम करू शकणार आहे, असेही न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.