२३० इमारतींचा प्रश्न; हट्टी रहिवासी जुमानत नसल्याने पालिका हतबल

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : पावसाळा जवळ आल्यामुळे पालिकेने मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. मात्र हट्टी रहिवाशी जुमानत नसल्याने, तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे तब्बल २३० अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम करणे पालिके ला अशक्य बनले आहे. आजही या इमारती कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी पावसाळा जवळ आल्यानंतर पालिका मुंबईतील आपल्या इमारतींची पाहणी करते. त्यानंतर अतिधोकादायक (सी-१), धोकादायक (२-१) इमारतींची यादी जाहीर केली जाते. ‘सी-१’ गटातील इमारती अतिधोकादायक असल्यामुळे रहिवाशांना स्थलांतरित करून त्या जमीनदोस्त केल्या जातात. तर ‘सी-२’ गटातील इमारतींची आवश्यक ती दुरुस्ती करण्याची सूचना संबंधितांना केली जाते. यंदाही सर्वेक्षण करून पालिकेने ३१ मार्च २०२१ रोजी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ४८५ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. यापैकी १४८ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तसेच १०७ इमारतींमधील रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र या इमारतींचे पाडकाम अद्याप झालेले नाही. लवकरच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या इमारती जमीनदोस्त करण्यात येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सी-१’ गटातील ४८५ पैकी २३० अतिधोकादायक इमारती आजही ‘जैसे थे’ स्थितीत उभ्या आहेत. या इमारतींमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. यापैकी ७५ इमारतींची प्रकरणे न्यायालयात असून न्यायालयाने या इमारतींच्या बाबतीत पुढील कारवाईस स्थगिती आदेश दिले आहेत. नोटीस बजावल्यानंतरही अतिधोकादायक इमारत रिकामी करण्यास रहिवाशांनी नकार दिल्यामुळे सुमारे ११२ इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र तरीही रहिवाशी याच इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच रहिवाशी वास्तव्यास असलेल्या अन्य २७ धोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा सुरू आहे. लवकरच या इमारतींवर कारवाई करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रहिवाशांनी जीव धोक्यात घालून धोकादायक इमारतीत वास्तव्यास राहू नये. वेळीच इमारत रिकामी करून पर्यायी घरात सुखरूप राहावे, असे आवाहन या अधिकाऱ्याने केले आहे.

कारवाई अशी होते..

पाहणीअंती इमारत अतिधोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ रहिवाशांवर नोटीस बजावण्यात येते आणि इमारत रिकामी केली जाते. बहुसंख्य रहिवाशी इमारत रिकामी करण्यास तयार होत नाहीत. धोकादायक इमारतीत जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत असतात. काही रहिवासी पालिकेच्या नोटिशीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतात. नोटीस बजावल्यानंतरही रहिवाशांनी इमारत रिकामी न केल्यास तिचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला जातो. त्यानंतरही इमारत रिकामी करण्यास रहिवासी तयार नसल्यास पोलिसांची मदत घेण्यात येते. पोलिसांच्या मदतीने रहिवाशांना स्थलांतरित करून संबंधित इमारत रिकामी केली जाते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.