आवाज घटला तरी हवेचे प्रदूषण कायम

गेल्या काही वर्षांत फटाक्यांच्या आवाजांची तीव्रता कमी झाली असली तरी फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कायम आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २००९ पासूनच्या पाहणीनुसार दिवाळीदरम्यान हवेचे प्रदूषण वाढते. या वर्षीही फटाक्यांमध्ये शिसे, पारा तसेच सल्फर व कार्बन यांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आवाज फाऊंडेशनने केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या वर्षी फटाक्यांचा आवाज काहीसा कमी भासला तरी प्रदूषण पसवणाऱ्या घातक रसायनांकडे दुर्लक्षच झाले आहे.
हवेतील प्रदूषणाचे मापन त्यातील अपायकारक घटकांच्या प्रमाणावरून केले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वांद्रे येथील केंद्रात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स तसेच हवेत तरंगणारे धूलिकण यांचे मापन रोज केले जाते. एका घनमीटर हवेत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्सचे प्रमाण ८० मायक्रोग्रॅम तर धूलिकणांचे प्रमाण १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुंबईत अनेकदा हे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर तसेच बांधकामे त्यासाठी कारणीभूत असतात. पण दिवाळीत हे प्रमाण दुपटीहून अधिक होत असल्याचे २००९ पासून दिसून येत आहे. त्यातही सल्फर डायऑक्साइड तसेच नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मर्यादित पातळीपेक्षा फार वर जात नसले तरी धूलिकणांची संख्या मात्र सुरक्षित मात्रेच्या दुप्पट अधिक होते.
फटाक्यांमधून होणारे आवाज, त्यातील रंग, आतषबाजी यामुळे लहानथोर खूश होत असले तरी फटाक्यांना त्यांची ही वैशिष्टय़े मिळवून देण्यासाठी त्यात घातली जाणारी रसायने आरोग्याला हानीकारक ठरत आहेत. आवाज फाऊंडेशनने बाजारात उपलब्ध असलेल्या नामवंत ब्रॅण्डच्या विविध फटाक्यांची पाहणी केली.

पाहणीत आढळलेले शिसे आणि पारा हे दोन्ही घटक हानिकारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. लहान मुले फटाके जास्त प्रमाणात हाताळतात, त्यामुळे अशा फटाक्यांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांकडे केली आहे, असे आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली म्हणाल्या. सल्फर आणि कार्बन यांचे प्रमाणही फटाक्यांत अधिक असल्याचे प्रयोगशाळेतील चाचणीत आढळले.

आवाजाचे परिणाम थेट जाणवत असल्याने कदाचित ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे आवाज गेल्या काही वर्षांत कमी झाले आहेत. मात्र हवेच्या प्रदूषणाचे परिणाम अप्रत्यक्षरीत्या होत असल्याने अजूनही फटाक्यांमधील रासायनिक घटकांसंदर्भात गांभीर्याने पाहिले जात नाही.
– एक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ