मुंबई: आजच्या काळात इतिहास पुसून बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा स्थितीमध्ये सामान्य व्यक्तींनी इतिहासाच्या नोंदी करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तंत्रज्ञानामुळे आणि मोबाइलमुळे सामान्य व्यक्तीला ही या नोंदी करणे आता सहज शक्य आहे. विशेष म्हणजे या नोंदी आपल्या सारख्या व्यापक विचारांच्या व्यक्तीने करणे अधिक गरजेचे आहे, असे ठाम मत चित्रपट दिग्दर्शक आनंद पटर्वधन यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त महाराष्ट्रासह विविध चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या, राष्ट्र सेवा दलाचे काम तळागाळात पोहचविण्यासाठी धडपडणाऱ्या, शिक्षणाच्या जागरासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेल्या, वंचित-शोषित समाजाबाबत केवळ संवेदना व्यक्त न करता कृतीशीलतेवर भर देणाऱ्या दत्ता गांधी यांचा १०० वा वाढदिवस रविवारी विलेपाल्र्यात साजरा केला गेला. त्यावेळी ते बोलत होते.

दत्ता आणि आशा गांधी या जोडप्याचा राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा ६२ वर्षांचा प्रवास दृश्य स्वरुपात जतन केलेला ‘मारुं जीवन ए ज मारी वाणी’ हा माहितीपट यावेळी सादर करण्यात आला. सामाजिक कायर्म्कर्त्यां मेधा पाटकर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन वैद्य, चित्रपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन, चित्रपट समीक्षक दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे आणि आय ट्रान्सफॉर्मचे संस्थापक समीर जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच राष्ट्र सेवा दलाशी जोडलेल्या अनेक दिग्गज कायर्म्कर्तेही यावेळी उपस्थित होते.

गोली मार दो असे जाहीरपणे सांगणाऱ्या व्यक्तीच्या हातात सध्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची सूत्रे सोपविली आहेत. इतिहासांच्या नोंदीचे संग्रहण नष्ट करून इतिहास बदलण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. गांधीचा खून कोणी केला हे ही आता बदलले जात आहे. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियासह दृश्य आणि श्राव्य स्वरुपातील माध्यमे एका जागी केंद्रीत करून दाबून ठेवले जात आहेत. या काळात हा इतिहास मौखिक स्वरुपात मांडला तरच खरा इतिहास लोकांना समजू शकेल. नुकतेच झालेल्या शेतकरी आंदोलनचा लढा आपण जिंकलो आहोत. अशा अनेक आंदोलनाचा इतिहास दृश्यस्वरुपात चित्रित झालेला आहे. त्यामुळे याची इतिहासात निश्चितच नोंद केली जाणार आहे. हा इतिहास ते त्यांच्या फेक न्यूजच्या पद्धतीने मांडत आहेत. म्हणून हा इतिहास आपल्या सारख्या व्यक्तींनी सांगणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. पटवर्धन यांनी व्यक्त केले. मुंबई जवळच्या ग्रामीण भागातही वेगवेगळे अस्तित्त्वाच्या प्रश्नांशी लोक झुंजत आहेत. परंतु भोंग्याच्या राजकारणात हे प्रश्न सोडविणे दूरच. आज शिक्षण धोरण बदलून    कुठल्या दिशेने जात आहे असा प्रश्न मेधा मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta gandhi s 100th birthday celebrated in presence of director anand patwardhan zws
First published on: 16-05-2022 at 04:25 IST