मुंबई : दशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखच्या संपर्कात असलेला म्होरक्या अ‍ॅन्थोनी ऊर्फ अनस ऊर्फ अन्वर हा दाऊद टोळीसाठी काम करणारा शाकीर हुसैन शेख असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शाकीर हा दाऊद टोळीसाठी पाकिस्तानातून काम करत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

पाकिस्तानातील म्होरक्या अ‍ॅन्थोनी ऊर्फ अनस ऊर्फ अन्वर याच्या संपर्कात असल्याचा संशयावरून एटीएसने जोगेश्वरी परिसरातून झाकीर हुसेन शेख (५२) याला अटक केली होती. त्याच्या मोबाइल फोनची विल्हेवाट लावल्याप्रकरणी एटीएसने मुंब्रा येथील रिझवान इब्राहिम मोमीन (४०) याला अटक केली. परदेशात बसून भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेला अ‍ॅन्थोनी हा शाकीर हुसेन शेख असल्याचा यंत्रणांना दाट संशय आहे. तो अटक आरोपी झाकीरचा भाऊ आहे. २००१ मध्ये बड्या नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी शाकीरचे नाव सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले होते. तेव्हापासून तो गायब आहे.

दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा विश्वासू असलेला शाकीर आखाती देशातील त्याचे काम पाहतो. पाकिस्तानात तो अन्वर म्हणून वावरतो. संशय येऊ नये यासाठी झाकीरच्या मोबाइलमध्ये त्याने अ‍ॅन्थोनी असे नाव ठेवले होते. २००१ ते २०१५ या कालावधीत तीन गुन्ह्यांमध्ये शाकीरचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अनेक वर्षांनंतर तो सक्रीय झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.