scorecardresearch

अमेरिकन सरकारने एकदा माझ्या पाक दौऱ्याचा खर्च उचलला होता

लष्करला लाखो रुपये देणगी दिल्याचाही दावा

devid headley, डेव्हिड हेडली
डेव्हिड कोलमन हेडली

डेव्हीड हेडलीचा खुलासा

लष्करला लाखो रुपये देणगी दिल्याचाही दावा

२६/११ हल्ला खटला
अमेरिकन सरकारने एकदा आपल्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्च उचलला होता, असा खुलासा २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यातील अमेरिकन पाकिस्तानी आरोपी डेव्हीड कोलमन हेडली याने बुधवारी विशेष न्यायालयासमोर केला. एवढेच नव्हे, तर लष्कर-ए-तोयबाने आपल्याला कधीच पैसे दिले नाहीत, तर आपणच २००६ पर्यंत त्यांना ७० लाख पाकिस्तानी रुपयांहून अधिक देणगी दिल्याचा दावा हेडलीने केला.

खटल्यातील आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांनी माफीचा साक्षीदार बनलेल्या हेडलीची उलटतपासणी सुरू केली, त्यावेळेस हेडलीने हा खुलासा केला. विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश जी.ए. सानप यांच्यासमोर सुरू असलेल्या या उलटतपासणीत वेळोवेळी माफीचा साक्षीदार बनून हेडलीने शिक्षेपासून कसा स्वत:चा बचाव केला आणि निष्पापांना गोवले आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न खान यांनी केला. मुंबई हल्ल्यापूर्वी हेडलीला अंमलीपदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीसाठी दोनवेळा शिक्षा सुनावण्यात आली होती, पण माफीचा साक्षीदार म्हणून शिक्षेतून सूट मिळाल्यावर हेडलीने अटींचा भंग करत नव्याने गुन्हा केल्याचेही खान यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

१९९८ मधील अटकेनंतर अमेरिकेच्या अंमलीपदार्थ अंमलबजावणी विभागाने (डीईए) आपल्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्च उचलला होता, परंतु त्यापूर्वी म्हणजेच १९८८ ते १९९८ या कालावधीत आपण त्यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती पुरवल्याच्या आरोपाचा मात्र हेडलीने वेळेस इन्कार केला. शिवाय, लष्करकडून वेळोवेळी पैसे मिळत असल्याच्या आरोपाचेही त्याने खंडन केले. उलट, आपणच संघटनेला ६० ते ७० लाख पाकिस्तानी रुपयांहून अधिक देणगी दिल्याचा दावा हेडलीने केला. २००६ मध्ये शेवटची देणगी दिल्याचे सांगताना हा निधी लष्करच्या विशिष्ट कटासाठी नसल्याचा दावा त्याने केला. देणगीचा हा निधी न्यूयॉर्कमधील व्यवसाय आणि पाकिस्तानातील मालमत्ता विकून आलेल्या पैशांतून दिला होता, असेही त्याने स्पष्ट केले. त्याच वेळेस माफीच्या साक्षीदाराच्या अटींचे उल्लंघन करून आपण पाकिस्तानला गेल्याचा आणि लष्करासाठी काम केल्याचा खुलासाही त्याने केला. एवढेच नव्हे, तर तहव्वूर राणाला आपण लष्करसाठी काम करत असल्याचे माहीत होते आणि २६/११ च्या हल्ल्याच्या आधीच त्याला हे सांगितल्याचा दावाही त्याने केला.

तत्पूर्वी, पहिली पत्नी शाजियाशी झालेल्या बोलण्याविषयीच्या एकाही प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचे हेडलीने खान यांना सांगितले. त्याने ती नेमकी कुठे आहे, हे उघड करण्यासह तिच्या वडिलांचे नाव सांगण्यासही नकार दिला. शाजियाच्या याबाबतच्या प्रतिक्रियेविषयी खान यांनी विचारताच, तो आमच्या दोघांमधील संवाद असून तो उघड करू शकत नसल्याचे त्याने सांगितले, तर शाजियाविषयीच्या प्रश्नांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आक्षेप नोंदवला, परंतु पती-पत्नीमधील संवाद उघड करण्याचा की नाही, याचा निर्णय न्यायालय गुरुवारी घेणार आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2016 at 02:39 IST

संबंधित बातम्या