मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार फारूख अटकेत

घटनेनंतर २५ वर्षांनी ताब्यात

घटनेनंतर २५ वर्षांनी ताब्यात

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या कटू आठवणींना मोहम्मद फारूख यासीन मन्सूर ऊर्फ फारूख टकला याच्या अटकेने उजाळा मिळाला. पुढल्या आठवडय़ात या भीषण बॉम्बस्फोट मालिकेला २५ वष्रे पूर्ण होत आहेत. दुबईतून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या फारूखला गुरुवारी पहाटे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. संध्याकाळी त्याला मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयात हजर केले गेले. फारूख बॉम्बस्फोट मालिकेचा कट आखणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एक असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयासमोर केला. पुढील चौकशी व तपासासाठी न्यायालयाने फारूखला १९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत धाडले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम, त्याचा धाकटा भाऊ अनीस इब्राहिम, टायगर मेमन या मुख्य आरोपींप्रमाणे फारूख कट रचण्यात सहभागी होता. ठरलेल्या कटाप्रमाणे बॉम्बस्फोट मालिका घडवण्यातही त्याचा सहभाग होता. याशिवाय फारूखने बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम बिस्मील्लाह खान ऊर्फ सलीम कुर्ला आणि त्याच्या चार साथीदारांना दुबईत आसरा दिला. त्यांच्या राहाण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी दुबईमार्गे पाकिस्तानात धाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांच्या विमान तिकिटांसह अर्थसहाय्य पुरवण्यापर्यंतची मदत फारूखने केली, असा दावा सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. दीपक साळवी यांनी न्यायालयासमोर केला. याआधी न्यायालयासमोर आलेल्या चार आरोपींनी कबुली जबाबात फारूखच्या सहभागाची माहिती दिली होती. त्याव्यतिरिक्त बॉम्बस्फोट मालिकेसाठी फारूखने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे, अ‍ॅड. साळवी यांनी न्यायालयाला सांगितले. तर बचावपक्षातर्फे अ‍ॅड. फरहाना शहा यांनी फारूखच्या पोलीस कोठडीस विरोध केला. पण न्यायालयाने अ‍ॅड. शहा यांची मागणी फेटाळून लावली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष बॉम्ब तयार करणे, ते पेरणे किंवा सीमेपलीकडून आलेल्या आणि रायगडच्या किनाऱ्यावर उतरवलेल्या आरडीएक्ससह अन्य स्फोटकांची खेप उतरवून घेणे या गुन्ह्य़ांमध्ये फारूखचा सहभाग आतापर्यंतच्या सीबीआय तपास व न्यायालयीन प्रक्रियेत पुढे आलेला नाही. पण रायगड किनाऱ्यावर स्फोटकांची खेप उतरल्यानंतर अनीस इब्राहिमने गुजरात बंदरात मोठय़ा प्रमाणात एके ४७, काडतुसे, हॅण्ड ग्रेनेड असा शस्त्रसाठा धाडला होता. तो साठा मुंबईत आणून हस्तकांना वितरित करणाऱ्या आरोपींना फारूखने दुबईतून सर्वतोपरी सहकार्य केले होते.

बॉम्बस्फोट मालिकेनंतर टायगर मेमनसह अन्य आरोपी दुबईत पसार झाले होते. फारूख मधल्या काळात दाऊद टोळी विशेषत: छोटा शकीलच्या संपर्कात होता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेने बॉम्बस्फोटातील फरार आरोपींसोत दाऊद, शकीलच्या दुबई, पाकिस्तानातील हालचालींबाबत बरीच माहिती सीबीआयला मिळू शकेल.

जुळे भाऊ, दाऊद आणि मुंबई पोलीस

फारूख आणि अहमद हे जुळे भाऊ. दोघांचाही शोध बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबई पोलीस व सीबीआयने सुरू केला. यात मुंबईत असलेला अहमद पकडला गेला. तर फारूख पसार झाला. पुढे अहमद या खटल्यातून दोषमुक्त झाला. पण मधल्या काळात त्याने पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ये-जा सुरू केली. आजही त्याचा पोलीस आयुक्तालयात सर्रास वावर असतो. काही ठराविक अधिकाऱ्यांशी त्याची सलगी असल्याचीही चर्चा आहे. मध्ये ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर प्रकरणात अहमदकडे चौकशी केली होती. दाऊद, अनीस आणि छोटा या तिघांशी मुंबईतून रोजच्या रोज बोलणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये अहमदचाही सहभाग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे.

भोवळ, लुडबूड, न्यायालयाचा दम

फारूखला सीबीआयने गुरुवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर विशेष टाडा न्यायालयात हजर केले. न्यायालय त्याला नाव काय, कुठून अटक केली, पोलिसांविरोधात त्रास आहे का, असे प्रश्न विचारत होते. तेव्हा वकीलांच्या गर्दीत उपस्थित फारूखचा भाऊ अहमदने एका प्रश्नाचे उत्तर देत लुडबूड केली. तेव्हा न्यायालयाने तू कोण, तू का उत्तर देतोस, कोणाच्या परवानगीने तू न्यायालयीन प्रक्रियेत लुडबूड करतोस, अशा प्रश्नांची सरबत्ती अहमदवर केली. तेव्हा मी फारूखचा जुळा भाऊ आहे, मीही तुरुंगात होतो, असे उत्तर अहमदने दिले. ते ऐकून न्यायालयाने अहमदला दम दिला आणि प्रक्रिया सुरू केली. काही वेळात अहमद भोवळ येऊन खाली कोसळला. त्यामुळे पुन्हा प्रक्रियेत व्यत्यय आला आणि न्यायालय संतापले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dawood aide farooq takla arrested from delhi airport in 1993 bombay bombings case

ताज्या बातम्या