ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीशाह पारकरने ईडीला सांगितलं, “दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता.”

हेही वाचा : “नवाब मलिकांचे दाऊदसोबत संबंध”, न्यायालयाच्या निरिक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केलं आहे.

दाऊद कनेक्शनवरून राज्यातील राजकारणाचा पारा चढला

दरम्यान, मागील काळात अनेकदा राजकारण्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झालेत. यात शरद पवारांपासून अनेकांवर हे आरोप झाले. आता असेच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर झालेत. विशेष म्हणजे यावेळी केवळ आरोपच झाले असे नाही, तर विशेष न्यायालयाने ईडीने सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी मलिकांचे दाऊद कंपनीशी संबंध असल्याचं निरिक्षण नोंदवलं. यानंतर भाजपाने राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देखील दिलं.

न्यायालयाने नेमकं काय म्हटलं होतं?

विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहूल एन रोकडे यांनी म्हटलं होतं, “आरोपी नवाब मलिक यांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली.”

“मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लाँण्ड्रींगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल. या सर्वांनी या गुन्ह्यांतून मिळणारे उत्पन्न हे बेकायदेशीर कृत्यांमधून मिळवले आहे,” असं न्यायालयाने म्हटलं.

हेही वाचा : दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं पुराव्यांवरुन दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण

“प्रथमदर्शनी असं दिसून येतय की आरोपी हा थेट आणि सर्व माहिती असूनही मनी लाँण्ड्रींगमध्ये सहभागी होती. त्यामुळेच तो पीएमएलए अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या कलमाअंतर्गत मनी लॉण्ड्रींगचा गुन्हा करण्यासाठी दोषी ठरतो. कलम ४ नुसार तो शिक्षेस पात्र ठरतो,” असंही न्यायालयाने म्हटल्याचं वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडियाने’ दिलंय.

मलिक-दाऊद संबंधाच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार म्हणाले, “न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमबाबत जे सांगितलं ते मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला खात्री आहे की त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. माझ्या मनात त्यांच्या कटिबद्धतेबद्दल अजिबात शंका नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसोबत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही.”

“माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते”

“असे आरोप केले जातात. त्याचं एकच उदाहरण सांगतो आणि हे उदाहरण म्हणजे शरद पवार आहे. माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते. काही लोकांनी तशी अनेकदा टीका-टिपण्णी केली होती. शेवटी ज्यांनी आरोप केले होते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधीमंडळात भाषण करून सांगितलं की आम्ही जी टीका केली त्यात काही तथ्य नाही. आम्ही विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो,”

“माझी खात्री आहे की जेव्हा सर्व चित्र समोर येईल त्यावेळी नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood ibrahim is in karachi pakistan alishah parker tell in ed statement pbs
First published on: 24-05-2022 at 11:23 IST