दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

रिजवान कासकर देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या

दाऊद इब्राहिम

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाककडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा सहकारी अफरोज वदारिया यालादेखील मुंबई पोलिसांनी हवाला प्रकरणी अटक केली होती. याचप्रकरणी दाऊदच्या पुतण्यालाही अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबाल कासकरदेखील खंडणीच्या एका गुन्ह्यात सध्या जेलमध्ये आहे.

याआधी खंडणी विरोधी पथकाने अहमद रजा याला अटक केली होती. अहमद रजा हा या प्रकरणात फरार असणाऱ्या फहीमचा जवळचा सहकारी आहे. अहमद रजा याला आंतररराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. अहमद रजा दुबईहून मुंबईला आला होता आणि रिजवानच्या संपर्कात होता. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद रजा हा शकील आणि फहीम यांचा निकटवर्तीय असून मुंबई, ठाणे आणि सुरतमध्ये हवाला व्यवसाय करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

काही दिवसांपुर्वी दाऊद इब्राहिमचा सहकारी रियाज भाटी यालादेखील मुंबईत अटक करण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकानेच ही कारवाई केली होती. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमसीए क्लबची सदस्यता मिळवण्यासाठी रियाज भाटीने मुंबईमधील विल्सन कॉलेजची बनावट कागदपत्रं तयार केली होती. २०१३ मध्ये त्याने क्लबचं सदस्यत्व मिळवलं होतं अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पाकिस्तानने नेहमीच दाऊद इब्राहिम आपल्या देशात नसल्याचा दावा केला आहे. मात्र वारंवार पाकिस्तानचा हा दावा फोल ठरला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हाती एक फोटो लागला आहे ज्यामध्ये दाऊद खास मित्र जाबिर मोतीवालाची भेट घेत असल्याचं दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत दाऊद एकदम व्यवस्थित दिसत आहे. याआधी दाऊदची प्रकृती ठीक नसल्याचं वृत्त आलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जाबिर मोतीवाला दाऊदच्या क्लिंफ्टन हाऊस येथील बंगल्याच्या शेजारी राहतो. त्यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याची माहिती आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dawood ibrahim nephew rizwan kaskar arrested by anti extortion cell of mumbai crime branch sgy

ताज्या बातम्या