महाराष्ट्र विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला, असून अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला मोठं गिफ्ट दिलं आहे. धनगर समाजातील लोकांना किमान २५ हजार घरं देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबई येथे धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
धनगर समुदायाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण वेगवेगळ्या घरांच्या योजना तयार करतो. मात्र, त्याचा धनगर समाजाला पाहिजे तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे ठरवलं की, घरं तर बांधायची आहेतच. पण यातील २५ हजार घरं धनगर समाजाला मिळाली पाहिजेत. ही संख्या किमान आहे, कमाल नाही. त्यामुळे यापेक्षा अधिक घरंही मिळाली तर अधिक चांगलं आहे. लोकांना हळूहळू योजना समजतील आणि ते या योजनांचा लाभ घेतील. आपल्याला या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील, ही आपली जबाबदारी आहे.”
हेही वाचा- “सरकारमधील एक मंत्री बेशरमपणाने…”, ‘त्या’ विधानावरून जितेंद्र आव्हाडांचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल!
“खरं तर, धनगर समाजाला किंवा मेंढपाळांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यायचं, यासाठी १० हजार कोटी रुपयांची योजना घोषित केली आहे. काही लोकांना वाटतं हे कसं शक्य आहे? पण गेल्या काही महिन्यांपासून आम्ही यावर काम करत होतो. राष्ट्रीय सहकारी निगम (NCDC) च्या माध्यमातून राज्य सरकारला कर्ज घेता येतं. त्यावर जे व्याज आहे, ती सरकारने सबसिडी स्वरुपात दिली. तर लोकांना बिनव्याजी कर्ज मिळवून देता येऊ शकतं. यासंदर्भात आपले मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आणि मी दोघंही अमित शाहांना भेटलो. त्यांच्या माध्यमातून आम्ही एनसीडीसीशी चर्चा केली. त्यानंतर एनसीडीसीचे अधिकारी आमच्याकडे चर्चेसाठी आले. चर्चेअंती आम्ही संपूर्ण आराखडा ठरवला. त्यामुळे ज्या काही योजना तयार केल्या आहेत. त्या योजना हवेत तयार केल्या नाहीत,” असंही फडणवीस म्हणाले.